महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

 महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

Updated: Dec 10, 2021, 01:53 PM IST
महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी  title=
संग्रहित छाया

मुंबई : Threats to Kishori Pedankar : महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pedankar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, गतवर्षी जून महिन्यात फोनवरुन किशोरी पेडणेकर यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा निनावी पत्र थेट महापौर बंगल्यात आले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. (Letter of threat to Mumbai Mayor Kishori Pedankar)

शिवसेना नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या वादानंतर आता महापौरांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे पत्र पाठविण्यात आले असून या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौर पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच तुमच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारु, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. धमकीचे वृत्त समजताच शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी महापौर यांच्या घरी दाखल झाल्या आहेत.

धमकीचे पत्र गुरुवारी संध्याकाळी महापौर बंगल्यावर आले आहे. या पत्राद्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पनवेलमधून कुरियरद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. पत्राच्यावर आणि पत्राच्या मजकुराखाली दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. तसेच यामध्ये खारघर, पनवेल आणि उरण या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शेलार यांची एक लाख रुपयांचा जामीन झाला. दरम्यान, आपल्यावरी गुन्हा रद्द करण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.