दीपक भातुसे , मुंबई : कर्जबाजारी शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी १० हजार रुपये उचल देण्याची राज्य सरकारची योजना फसली आहे.
११ जून रोजी सरकारने याबाबतचा जीआर जारी केला होता. मात्र गेल्या साडे तीन महिन्यत राज्यातील ३७ लाख थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी केवळ २४ हजार १३१ शेतकऱ्यांना ही १० हजार रुपये उचल मिळाली आहे.
राज्यात शेतकरी कर्जमाफी लागू होईपर्यंत शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी फायदा व्हावा म्हणून सरकारन १० हजार रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला. तसे आदेशही बँकाना दिले. मात्र यातील अटींमुळे ३७ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ४३ हजार १८ शेतकऱ्यांनी ही १० हजार रुपये उचल मिळावी म्हणून अर्ज केला. यातील १० हजार शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले.
तर २४ हजार १३१ शेतकऱ्यांना १० हजार रुपयांप्रमाणे २४ कोटी ८ लाख रुपये १४ ऑगस्टपर्यंत वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला नसल्याचे उघड होतंय. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असल्याची टीका याप्रकरणी विरोधकांनी केली आहे.