रुपेंद्र पवार/ मुंबई : दक्षिण मुंबईतील काळाचौकीचा महागणपती गणेशोत्सव दरवर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. यावर्षीही उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. काळाचौकीच्या महागणपतीची स्थापना १९५६ रोजी करण्यात आलेय. गणेशोत्सवाचे हे ६३ वे वर्षे आहे. आज मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने काळाचौकीच्या महागणपतीचे पाटपूजन आणि पाद्यपूजन करण्यात आले.
पुढील महिन्यात गणपतीचे आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी सर्वांचीच तयारी सुरु झालेय. काळाचौकी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीचे पाद्य पूजन मोठ्या उत्साहात झाले. संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त साधत काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणरायाचा पाद्यपूजन सोहळा ढोलताशांच्या गजरात पार पडला. यावेळी अबाल-वृद्धांपासून सर्वांनी एकच जल्लोष साजरा केला.
यावेळी काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय तथा दाऊ लिपारे, प्रमुख कार्यवाह शेखर साळवी, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, कोषाध्यक्ष योगेश गावडे, स्वागताध्यक्ष सुनील सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काळाचौकीच्या महागणपतीचे पाटपूजन आणि पाद्यपूजन सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले. यावेळी स्वागत समारंभही करण्यात आला. या सोहळ्याला भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.