शरद पवारांनी उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठिशी घातलं- आव्हाड

त्यांच्यासाठी साताऱ्यातील जवळच्या लोकांना दुखावलंत.

Updated: Sep 14, 2019, 12:23 PM IST
शरद पवारांनी उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठिशी घातलं- आव्हाड title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर टीकास्त्र सोडले. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, साहेब उदयनराजेंवर तुम्ही मनापासून प्रेम केलेत. त्यांच्यासाठी साताऱ्यातील जवळच्या लोकांना दुखावलंत. त्यांच्या सगळ्या आचरट आणि बालिश चाळ्यांना पाठिशी घालत पोरावणी प्रेम केलेत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. या सगळ्यामधून साहेब तुम्हाला काय मिळाले?, असा उद्विग्न सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. 

मात्र, सातारा जिल्ह्यात शरद पवारांचेच वर्चस्व राहील, असे आव्हाडांनी सांगितले आहे. 'यशवंतरावांचा सातारा जिल्हा, शरद पवारांचा बालेकिल्ला', अशी घोषणा आव्हाडांनी ट्विटमध्ये दिली आहे. त्यामुळे आता उदयनराजे आव्हाडांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दिल्लीत अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी म्हटले की, सेवाभाव ही छत्रपती घराण्याची परंपरा आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसोबत काम करून ही परंपरा मला पुढे न्यायची आहे. कोणाच्या सांगण्यावरून नव्हे तर नरेंद्र मोदी यांचे विचार पटल्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे उदयनराजेंनी सांगितले. 

राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी उदयनराजे भोसले हे एक होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. आता साताऱ्यातील पोटनिवडणुकीत काय निकाल लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.