बाळासाहेबांच्या तैलचित्रचं अनावरण संपन्न! पुत्राचीच दांडी; मात्र राज ठाकरेंचं भाषण गाजलं

Installation of Balasaheb Thackeray Oil Painting: विधानभवनामध्ये आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं असून या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित असले तरी उद्धव ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली नाही.

Updated: Jan 23, 2023, 10:53 PM IST
बाळासाहेबांच्या तैलचित्रचं अनावरण संपन्न! पुत्राचीच दांडी; मात्र राज ठाकरेंचं भाषण गाजलं title=
Uddhav Thackeray Absent Raj Thackeray Present

Balasaheb Thackeray Oil Painting: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये तैलचित्राचं अनावरण केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या चित्रणाचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. मात्र त्याचवेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली असून त्यांचं भाषण चांगलेच चर्चेत राहिलं. या कार्यक्रमाला शिंदे गटातील सर्व आमदार उपस्थित आहेत.

एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण केलं. या कार्यक्रमाला सरकारकडून सर्वपक्षीय मान्यवरांना आमंत्रित केलं होतं. यामध्ये विरोधी पक्षाचे नेते अजित पवारांबरोबरच ठाकरे कुटुंबियांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र ठाकरे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. अजित पवार विधानभवनामध्ये या कार्यक्रमासाठी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पोहोचले. उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती आणि त्याचवेळी राज ठाकरेंची उपस्थितीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या उपस्थितीमधून पुन्हा एकदा मनसे सत्तेत शिंदे गट-भाजपाबरोबर मांडीला मांडी लावून बसणार की काय यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे.

LIVE UPDATES:

> अभिनेता प्रसाद ओक या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे.

> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या अध्यक्षा निलम गोऱ्हे विधानभवनातील कार्यक्रमाला उपस्थित.

> स्मिता ठाकरे, निहार ठाकरेही या कार्यक्रमासाठी विधानसभेच्या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरेंनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे.

> केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबरोबरच शिंदे गटातील अनेक आजी-माजी खासदारही विधानभवनातील या कार्यक्रमात हजर आहेत.

> बाळासाहेबांचा जीवनप्रवास दाखवणारी डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. या डॉक्युमेंट्रीमध्ये आनंद दिघे, एकनाथ शिंदेंबरोबरच अनेकांचे फोटो दिसत आहेत.

> बाळासाहेबांच्या जुन्या भाषणांच्या व्हिडीओ क्लिप्सही या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आल्या.

> कलम 370 रद्द करण्याच्या मुद्द्याचा उल्लेख करत या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची क्लिपही दाखवण्यात आली.

> पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बाळासाहेबांचं तैलचित्र विधानसभेच्या सभागृहात लावण्याची मागणी केली. ही मागणी नार्वेकरांनी मान्य केली, असा उल्लेख या डॉक्युमेंट्रीमध्ये आहे.

> मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसहीत इतर मान्यवर तैलचित्राचं अनावरण करण्यासाठी मंचावर स्थानापन्न झाले.

> दिपक केसरकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना दिली. यामध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

> मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची सन्मान करण्यात आला.

> विधानपरिषदेचे विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

> विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना पोटात एक आणि ओठावर एक असं बाळासाहेबांचं कधीच नव्हतं, असं म्हटलं.

> बाळासाहेबांचा उल्लेख केवळ हिंदूहृदयसम्राट असा न करता शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट असा करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली.

> बाळासाहेबांनी आम्हाला वेड लावलं होतं. बाळासाहेब हिंदुत्वाचा धगधगता निखारा होता, असं नारायण राणे बाळासाहेबांची आठवण सांगताना म्हणाले.

> बाळासाहेबांच्या सहावासात राहणाऱ्यांनी त्यांच्या बिरुदावार बोलावं. बाळासाहेबांनी प्रेमाने शिवसैनिक गोळा केले, असं नारायण राणे म्हणाले.

> बाळासाहेब आजही हवे होते असं अनेकदा वाटतं, असं नारायण राणेंनी म्हटलं. 

> बाळासाहेबांच्या सानिध्यात राहता आलं हे आमचं भाग्य आहे, असं नारायण राणे म्हणाले.

> मी अनेक पराभव झालेल लोक यायचे त्यांना संभाळणारे, जिंकलेल्यांशी बोलणारे बाळासाहेब पाहिले आहेत. एक विलक्षण व्यक्तीमत्व मी पाहत आलो. मी लहानपणापासून मी त्यांच्याबरोबर गोष्टी पाहून शकलो म्हणून मी स्वत:चा एक राजकीय पक्ष पाहू शकतो. यश आलं तर हुरळूत जात नाही आणि पराभव झाला तर खचून जात नाही, असं राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं. येथे क्लिक करुन वाचा राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं.

> विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

> ठाण्यात यायचे तेव्हा म्हणायचे एकनाथ शिंदे आनंद दिघेंच्या तालमीत वाढलाय, मला आता ठाण्याची चिंता नाही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

> बाळासाहेब जनतेसाठी 'रिमोट कंट्रोल' वापरायचे. बाळासाहेबांमुळेच शिवसैनिक मोठे झाले, मुख्यमंत्री शिंदेंचं विधान.

LIVE VIDEO >

आदित्य ठाकरेंची टीका

दरम्यान, दुपारच्या सुमारास आदित्य ठाकरेंनी या कार्यक्रमावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. आपल्या चित्राचं गद्दारांच्या हातून अनावरण होतंय हे पाहून बाळासाहेबांनाही वाईट वाटेल, अशा अशयाची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. तर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी या तैलचित्र अनावरण प्रकरणासंदर्भात बोलताना, "अडीच वर्षांपूर्वी तैलचित्र अनावरण होणं अपेक्षित होते. कुणी उपस्थित राहावे कुणी नाही हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे भाग्य शिंदे-फडणवीस सरकारला मिळालं आहे इतकेच मी सांगेन," अशी प्रतिक्रिया नोंदवली. तर सुनिल तटकरे यांनी, "मला या संदर्भात कोणतही आमंत्रण आलं नाही. उद्धव ठाकरे यांनी जाव की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी ज्यावेळी विधानभवनात जाईल त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राला अभिवादन करेल," अशी प्रतिक्रिया नोंदवली. रिगल चित्रपटगृहासमोरील बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अभिवादन केलं. यावेळी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.