'महिला आयोगात रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका'; चित्रा वाघ यांचा घणाघात

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे

Updated: Oct 14, 2021, 10:59 AM IST
'महिला आयोगात रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका'; चित्रा वाघ यांचा घणाघात title=

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी महिला आणि मुलींवर अत्याचार बलात्काराच्या घटना घडत असताना महिला आयोगाला अध्यक्ष नसल्याचीही टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांची निवड लवकरच केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु यावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कडाडून टीका केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाकणकरांच्या निवडीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असताना भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चाकणकर यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यासंबधीचे ट्वीट त्यांनी केले आहे.

चित्रा वाघ ट्वीटमध्ये मध्ये म्हणतात...

महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे.

अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका

अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल

चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी राजकीय प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. वाघ यांच्या बोलण्याचा ओघ कोणाकडे यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. राज्यात महिलांच्या प्रश्नांवरून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात नेहमीच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. चित्रा वाघ यांच्या ट्वीटला चाकणकरांकडून काय प्रत्युत्तर मिळते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.