कविता शर्मा, झी मीडिया, मुंबई : स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यावर्षी एकाच दिवशी साजरे होत आहेत. त्यामुळे भक्ती आणि शक्तीचा हा विशेष दिन एकत्रित साजरा करण्याचा मानस इस्कॉन मंदिराचा आहे. श्रीकृष्णाला दाखवण्यात येणारा ५६ पदार्थांचा नैवेद्य यावर्षी तिरंग्याच्या रंगात असणार आहे.
कृष्ण जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिन इस्कॉन मंदिरात अनोख्या पद्धतीने साजरी होणार आहे. १५ ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमीचा नैवेद्य खास तिरंग्याच्या रंगात असेल. १००८ प्रकारचे नैवेद्य, ५४२३ फळं... ही सर्व केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगात असणार आहेत. नैवेद्याच्या तयारीला इस्कॉनच्या स्वयंपाकघरात सुरूवातही झालीय.
देशभरात भक्ती आणि शक्तीचा हा महोत्सव एकत्रित साजरा होईल. तिरंग्याला वंदन करताना भगवत गीतेचा धडा देणाऱ्या श्रीकृष्णालाही प्रमाण करण्यात येईल. कृष्णभक्तीत या नैवेद्याला फार महत्त्वं असतं. यावर्षी पाच हजार दोनशे त्रेचाळीसावा जन्मदिवस असल्याचं मानलं जातं. त्यामुळे इस्कॉन मंदिरात ५२४३ पदार्थांचा नैवेद्य केला जाईल. मात्र हे सर्व पदार्थ तिरंग्याच्या रंगात असणार आहेत.
तब्बल १ लाख भाविक उद्या मंदिरात दर्शन घेतील असा अंदाज आहे. त्यामुळे या नैवेद्याच्या तयारीला सुरूवात तीन दिवस आधीपासूनच सुरू झालीय. इस्कॉन मंदिरात एकूण ४ स्वयंपाक घरे आहेत. इथे हा नैवेद्य केला जातो. या किचनमध्ये सर्व अत्याधुनिक आयुधं उपलब्ध आहेत.
इथल्या चार स्वयंपाकघरांपैकी एक फक्त गोड मिष्टान्नांचं स्वयंपाक घर आहे. इथे देशभरातली विविध प्रकारची मिठाई तयार केली जाते.
श्रीकृष्ण भक्ती आणि देशभक्तीचा अनोखा सोहळा या १५ ऑगस्टला रंगणार आहे. भक्ती आणि शक्तीचा हा अनोखा संगम श्रीकृष्णाला दाखवलेल्या नैवेद्यातही अनोख्या पद्धतीने दिसणार आहे. त्यामुळे या नैवेद्याचा स्वाद काही औरच असणार आहे.