मुंबई : दिल्ली-मुंबई रस्ते प्रवास आता वेगवान होणार आहे. दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी केवळ १२ तासाचा अवधी लागणार आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचं काम प्रगतीपथावर आहे. यासाठी हरियाणात भू-संपादनाचं कामं पूर्ण झाल्यावर काम अजून वेगाने होईल. १२५० किमी इतक्या लांबीचा हा एक्सप्रेसवे गुरुग्रामच्या सोहनावरुन निघेल. १२५० किमी पैकी ८० किमी रस्ता हा हरियाणातून जातो.
एक्सप्रेसवेच काम पूर्ण झाल्यानंतर वेळेची बचत होणार आहे. तसंच दिल्लीतून-मुंबई अवघ्या १२ तासात गाठता येईल. या एक्सप्रेसवेवर ताशी १२० किमीच्या वेगाने गाड्या धावतील. सद्यस्थितीत दिल्ली-मुंबई प्रवासाला २४ तासांचा वेळ लागतो. दिल्ली-मुंबई धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला १६ तासांचा तर इतर रेल्वे गाड्यांना १७ ते ३२ तासांचा कालावधी लागतो.
हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ६० हजार कोटी रुपये लागणार आहेत. हा एक्सप्रेसवे हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार आहे. या प्रकल्पासाठी इतर राज्यात भूसंपादनाचं काम सुरु आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे चंबळ हायवेला जोडून असल्याने जयपूर, सवाई, उज्जैन, गोध्रा, अहमदाबाद यासारख्या अनेक शहरं जोडली जातील. एक्सप्रेसवेच्या कामाची सुरुवात ४० ठिकाणी एकाच वेळी होणार आहे.
या प्रकल्पासाठी लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया ५ डिसेंबर २०१८ पर्यंत सुरु असेल. यानंतर कंत्राटदारांना वर्गवारीनुसार कामाचं वाटप केलं जाईल. हा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होण्याची आशा आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग-८ वरुन जवळपास ३ लाख गाड्या ये-जा करतात. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.