मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात भाजप सरकारवर जोरदार टीका केलीच... पण, यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बोचरं प्रत्यूत्तर दिलंय.
'पवार म्हणाले सत्तेत राहून तुम्ही टीका कशी करता? आम्ही तुमच्यासारखी अदृश्य हातांनी साथ देत नाही... आमच्याकडे पारदर्शक शब्द नाही, आमच्याकडे खणखणीत आहे. तुम्ही स्व:त काय करता ते बघा ना, तुम्ही करत नाही म्हणून आम्हाला करावं लागतंय याची लाज वाटू द्या, असा टोला ठाकरेंनी पवारांना लगावलाय.
महागाई विरोधातील आंदोलन शिवेसेनेने सुरु केलं, ही तर नुसती सुरुवात आहे, असं काही करण्याच्या अवस्थेत तुम्ही राहिला आहात का? तुम्ही जनतेचा विश्वास गमावून बसला आहात... आज लोकांना कुणाचा विश्वास वाटत असेल तर तो शिवसेनेचा आणि माझ्या शिवसैनिकांचा, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
'मी पवारांचा शिष्य नाही... मी बाळासाहेबांचा शिष्य आहे... लपून छपून काम करत नाही... साथ द्यायची तर उघडपणे... लाथ घालायची ती पण उघडपणे....' असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्यानंतर शिवसैनिकांनीही टाळ्यांचा एकच गजर केला. सतत पाचव्यांदा शिवसेना मुंबई आणि ठाण्यात जिंकून आली हे श्रेय शिवसैनिकांचं, असं म्हणत पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्यांचंही कौतुक केलं.
हिंदू म्हणून शिवसेनाप्रमुखांनी पंखाखाली घेतलं होतं, त्या हिंदूंमध्ये फूट पाडून आपल्या अंगावर सोडण्याचं काम भाजपाने केलं... ज्यावेळी हिंदुत्व फुटेल तेव्हा तुमचे नशीब फुटेल... हिंदू आणि मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम तुम्ही करू नका... काम करत नाही पण २०१९ ची तयारी सुरू केली आहे, असंही त्यांनी भाजपला ठणकावून सांगितलंय.