मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान आता काहीसं कमी होतंय. पण असं असलं तरी राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढू लागलाय. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध वाढवले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दी वाढली आहे, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरी लाट पुन्हा उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणं हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील,' असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. दुसऱ्या लाटेचा प्रभाव पाहता 'पुढच्यास ठेस, मागचा शहाणा' या म्हणीप्रमाणं आपल्याला आधीच काळजी घ्यावी लागेल,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.
मालाड इथल्या कोविड केअर सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, 'सध्या आपल्याकडं कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत आपण दुसरी लाट थोपवली. पण, आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे,” असं सांगत मुख्यमंत्र्यांनी गर्दी करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला.
'पहिल्या लाटेच्या वेळेस आपण वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारलं. आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांचं हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही, असं सांगतानाच, 'दररोज 15 लाख नागरिकांचं लसीकरण करण्याचीही आपली तयारी आहे,' असं त्यांनी स्पष्ट केलं.