मुंबई : Sanjay Raut On ED and Devendra Fadnavis : राज्यसभा निवडणुकीवर शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन भाजप निवडणुका जिंकण्याचा डाव टाकत आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारला हाणला.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. महाराष्ट्रासह देशभरात निवडणुकीचं जे चित्र स्पष्ट झाले त्यात काही नवे नाही. केंद्र सरकारकडून शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आमच्याकडेही यंत्रणा आहे, मात्र ईडी नसल्याचा खोचक टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला. कोणत्याही अपक्षांचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आता निवडणूक झाली आहे. त्यामुळे तो विषय संपल्याचे सांगत राज्यसभेतील पराभवाच्या प्रश्नावर बोलण्याचे त्यांनी टाळले.
महाराष्ट्रात रात्रीच्या अंधारात निवडणूक आयोगाला हाताशी धरुन राज्यातले नेते काय करत होते, गृहखात्याचे कसे फोन येत जात होते, हे आम्हाला माहिती आहे. यंत्रणा आमच्याकडेही आहे, असे राऊत म्हणाले. त्याचवेळी ते म्हणाले, आमच्या हाती 48 तासांसाठी ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ईडीच्या माध्यमातून विजय संपादन करण्यात आला आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये एकाकी पाडण्याचा फडणवीस यांचा डाव आहे, अशी टीका राऊत यांनी केली. पंकजा मुंडे आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचं नाते आहे. आम्हाला पंकजा मुंडे यांची चिंता करण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका राऊत यांनी माध्यमांसमोर मांडली.