आता 15 मिनिटांत गाठता येणार नवी मुंबई; जाणून घ्या कसा आहे शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग

मुंबईतील शिवडी ते नाव्हा शेवा सागरी सेतुच काम पूर्ण झालं असून येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 22 किलोमीटरचे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात पार करता येणार आहे.

Updated: Jan 6, 2024, 12:38 PM IST
आता 15 मिनिटांत गाठता येणार नवी मुंबई; जाणून घ्या कसा आहे शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग title=

मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : मुंबईतून पुणे किंवा कोकणात जाण्यासाठी शिवडी ते नाव्हा शेवा असा अटल सागरी सेतू बांधून तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 जानेवारीला लोकार्पण होणार आहे. 22 किलोमीटरचे अंतर 15 ते 20 मिनिटात पार करता येणार आहे. या सागरी मार्गावर दोन्ही बाजूला तीन लेन आहेत. या सागरी सेतूवर किमान 60 ते 100 प्रतितास इतक्या वेगाने वाहने धावू शकणार आहेत. 2018 मध्ये सुरू झालेले काम अनेक अडथळे पार करून या वर्षी पूर्ण झालं आहे. या पुलावरून जातांना समुद्राचे विहिंगम दृश्य पाहायला मिळणार आहे.

सागरी सेतूवर सुरक्षेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तुटलेली वाहने टोइंग करण्यासाठी स्वंतत्र आपत्कालीन मार्गिका, अँटी-क्रॅश बॅरियर्स असलेला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक, मॉनिटरिंग सिस्टीम लावण्यात आली आहे. यासह पक्ष्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ध्वनी अडथळे लावण्यात आले आहेत. भूकंप, चक्रीवादळ, वाऱ्याचा दाब आणि भरती-ओहोटीच्या प्रभावामध्ये टिकून राहण्यासाठीसुद्धा ही संरचना तयार करण्यात आली आहे. सागरी सेतूचे घटक पुढील 100 वर्षांपर्यंत टिकून राहण्यासाठी गंजरोधक वस्तूंपासून बनलेले आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 10 देशांतील विषयतज्ञ आणि सुमारे 15000 कुशल मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम केले. हा अभियांत्रिकी अविष्कार 100 किमी प्रतितास वेगाने प्रवास करण्याऱ्या वाहनांसाठी तयार केला असून सदर रस्त्याची दररोज 70,000 वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. 16.5 किलोमीटर भाग समुद्रात आणि सुमारे 5.5 किलोमीटर भाग जमिनीवर उन्नत मार्ग स्वरूपात आहे. हा पूल एका बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असलेल्या मुंबई खाडीमध्ये आहे. त्यामुळे कंटेनर वाहून नेणारी मोठी जहाजे तसेच मासेमारीच्या बोटी येथून सतत ये-जा करीत असतात. कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या समुद्राखालील वाहिन्या भाभा अणु संशोधन संशोधन केंद्र आणि बीपीसीएलच्या तेल टर्मिनल्सची सुरक्षितता लक्षात घेऊन सदर प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.

या क्षेत्रात स्थलांतरीत पक्ष्यांचा विशेषत: फ्लेमिंगोंचा नैसर्गिक अधिवास असल्याने प्रकल्पाच्या समुद्रातील भागात खारफुटी व मडफ्लॅट्स इत्यादी पर्यावरणीय वैशिष्ट्यांना कमीत कमी नुकसान होईल याची एमएमआरडीएने काळजी घेतली आहे. तसेच उत्तर – दक्षिण असलेला पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग आणि पूर्व- पश्चिम असणारा वरळी-शिवडी उन्नतमार्ग हे एमटीएचएल प्रकल्पास जोडले जाणार आहेत. ज्यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे दक्षिण मुंबईतून व पश्चिम उपनगरातून येणारा प्रवाशांना विनाथांबा एमटीएचएलद्वारे मुख्य भूमीकडे जाणे शक्य होणार आहे. यामुळे एकतासाहून अधिक प्रवास वेळेची बचत होणार आहे.

पुलाच्या दुसऱ्याबाजुला, नवी मुंबईतील उलवे येथील शिवाजी नगर, उरण-पनवेल राज्य महामार्ग आणि मल्टीमॉडेल कॉरिडॉरवर (MMC) चिर्ले येथे इंटरजेंच करण्यात आले आहेत. या शिवाय भारतातील पहिल्या ओपन रोड टोलिंग प्रणालीमुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळेल. कमी प्रवासाचे अंतर आपोआप इंधनाचा वापर कमी करेल, तसेच हरितगृह वायू उत्सर्जन कमी करेल. या पुलामुळे आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.