Mumbai Coastal Road: मुंबईतील बहुप्रतीक्षीत व महत्त्वकांक्षी कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाला आहे. कोस्टल रोड खुला झाल्याने मुंबई प्रदेशाताली वाहतुक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत हजारोंच्या संख्येने वाहनांनी कोस्टल रोडला पसंती दिली आहे. अलीकडेच आलेल्या आकडेवाडीनुसार 22 हजार जणांनी कोस्टल रोडवरुन प्रवास केला आहे. मात्र, याच कोस्टल रोडवर या एका ठराविक वेळेत वाहतुक कोंडी होत असल्याचेदेखील या अहवालात दिसत आहे.
कोस्टल रोडचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वरळी ते मरीन लाइन्सपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक पर्यंतच प्रवास करु शकतात. तर, सकाळी 8 ते रात्री 8 इतर कॉपर चिमणी रेस्टॉरंट किंवा अमरसन उद्यानासारख्या इतर एन्ट्री पॉइंटने प्रवास करु शकतात. लोकार्पणानंतरच्या पहिल्याच दिवशी 16 हजार जणांनी कोस्टल रोडवरुन प्रवास केला. दररोज हा आकडा 10 टक्क्यांनी वाढत आहे. तर, शुक्रवारी हा आकडा 22 हजारांपर्यंत गेला आहे.
हजारोंच्या संख्येने नागरिक कोस्टल रोडचा वापर करत असल्याचे दिसत आहे. मात्र, कोस्टल रोडवरही वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सकाळच्या वेळेत वाहतुक सुरळीत असते. मात्र, दुपारी तीन ते चार या वेळेत वाहतुक कोंडी होत असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. सामान्यतः सर्वात जास्त रहदारीचा वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान असतात. मात्र या वेळेत रहदारी अगदी सामान्य आहे.
कोस्टल रोड संबंधीत एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त जॉयराइडसाठी (प्रवासाचा आनंद घेण्यासाठी येणारे) येणाऱ्या प्रवाशांमुळं दुपारच्या वेळेत वाहतुक कोंडी होत आहे. काहीवेळी एकाचवेळी तीन ते चार वाहने एकत्र येतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. कोस्टल रोडचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. हे चांगलं लक्षण आहे. पण फक्त फिरण्यासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या कमी झाल्यावर खरी आकडेवारी समोर येईल. तसंच, वरळी आणि हाजीअली इंटरचेंज सुरू झाल्यानंतर वरळीतील वाहतुकीची स्थिती सुघारेल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळी आठ ते संध्याकाळी आठच्या दरम्यान कोस्टल रोड सेवेत असणार आहे. त्यानंतर उर्वरित वेळेत दुसऱ्या मार्गिकांचे काम केले जाणार आहे. तसंच, शनिवारी-रविवारी कोस्टल रोड बंद ठेवण्यात येत आहे. कारण अधिक वेगात कोस्टल रोडचे उर्वरित काम पूर्ण होणार आहे.