ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आता आरामदायी होणार, मुंबई लोकलमध्ये करण्यात आले मोठे बदल

Mumbai Local Train Update: मुंबईल लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वे प्रशासनाने लोकलच डब्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 18, 2024, 11:16 AM IST
ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आता आरामदायी होणार, मुंबई लोकलमध्ये करण्यात आले मोठे बदल title=
Railways a reserve compartment for senior citizens in mumbai local

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून (Mumbai Local) गर्दीच्या वेळेत प्रवास करणे खूप कठिण होऊन जाते. ऑफीसला जाणारे कर्मचारी आणि कॉलेजचे विद्यार्थी यामुळं सकाळच्या वेळेत लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा उरत नाही. अशावेळी कधी कधी दिव्यांगासाठी राखीव असलेल्या डब्यात किंवा मालडब्ब्यातही प्रवासी चढतात. त्यामुळं गर्दीच्या वेळेत जेष्ठ नागरिकांना प्रवास करणे खूप कठिण होऊन जाते. मात्र, आता महामुंबईतील नागरिकांचा लोकल प्रवास सुखाचा होणार आहे. जेष्ठ नागरिकांसाठी एक डबा राखीव ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai Local Train)

जेष्ठ नागरिकांना रोजचा प्रवास करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळं त्यांची ही अडचण लक्षात घेऊन लोकलमधील मर्यादित आसनांच्या मुद्द्यावरुन मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला यावर तोडगा काढण्याची सूचना केली होती. त्यावेळी रेल्वेने मालडब्याचे जेष्ठांसाठीच्या राखीव डब्यांत रुपांतर करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले होते. तसा प्रस्तावही मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. आता रेल्वेच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळं लवकरच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये जेष्ठांसाठी राखीव डब्बा असणार आहे. 

एका लोकलमध्ये चार मालडब्बे असतात. गाडीच्या मध्यभागी असलेल्या मालडब्यात बदल करण्यात येणार असून त्याचे रुपांतर करुन तो जेष्ठांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या डब्यात 104 प्रवाशांची क्षमता असून 13 आसने आणि 91 उभे प्रवासी असे आसनक्षमता आहे. लवकरच हे बदल करण्यात येणार आहे. 

दरम्यान, लोकलच्या पहिल्या आणि शेवटच्या सेंकड क्लास डब्यात प्रत्येकी सात आसने जेष्ठ नागरिकांसाठी राखीव असतात. तर, 12 डब्यांच्या लोकलमध्ये 4 फर्स्ट क्लासचे डबे असतात. तर, तीन महिला प्रवाशांसाठी राखीव व दिव्यांग प्रवाशांसाठी दोन डबे आणि उर्वरीत डबे सर्वसामान्यांसाठी राखीव असतात. मालडब्यातील मालवाहकांचे प्रवासी भारमान अत्यंत कमी असल्याने एक मालडबा जेष्ठांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मध्य व पश्चिम रेल्वेने सर्वेक्षण केले होते. त्यानंतर या बदलाला संबंधित विभागाने मंजुरी दिली आहे. 

जेष्ठ नागरिकांसाठी घेतलेल्या या निर्णयानंतर हा बदल न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावेत, अशा सूचना संबंधित विभागाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच, हे बदल लवकरच दिसून येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.