Rs 84 Crore Heroin: मुंबई विमानतळावर महिलेकडे सापडले 84 कोटींचे अंमली पदार्थ; Airport बाहेर दोघांना अटक

Heroin Worth Rs 84 Crore At Mumbai Airport: मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला चौकशीसाठी थांबलं असताना तिच्या बॅगमध्ये हे अंमली पदार्थ आढळून आले.

Updated: Feb 16, 2023, 10:24 PM IST
Rs 84 Crore Heroin: मुंबई विमानतळावर महिलेकडे सापडले 84 कोटींचे अंमली पदार्थ; Airport बाहेर दोघांना अटक title=
Heroin Worth Rs 84 Crore

Rs 84 Crore Heroin At Mumbai Airport: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. या महिलेकडे तब्बल 84 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेकडे 12 किलो हेरॉइन (Heroin) सापडलं आहे. या महिलेला अटक करण्यात आली असून तिची चौकशी केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कुठून आली ही महिला?

डीआरआयने विमानतळाच्या बाहेर अन्य दोन व्यक्तींनाही या 84 कोटींच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शनमध्ये अटक केली आहे. ही महिला या दोघांना हे अंमली पदार्थ सोपवणार होती. "ही महिला झिम्बाब्वेची राजधानी असलेल्या हरारे शहरामधून मंगळवारी केन्या एअरवेजच्या विमानाने नैरोबी मार्गे मुंबईत दाखल झाली. तिला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवलं. सुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला तपासाठी थांबलं होतं," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

कुठे लपवलेले अंमली पदार्थ?

महिलेकडील सामानाची तपासणी करण्यात आली असता अधिकाऱ्यांना 11.94 किलो हेरॉइन सापडलं. "जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तब्बल 84 कोटी रुपये इतकी आहे. हे पदार्थ ही महिला ट्रॉली बॅक आणि फाइल फोल्डरमध्ये लपवून घेऊन जात होती. जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ आपल्याला हरारे विमानतळावर देण्यात आले होते. हे आपल्याला मुंबईतील दोन व्यक्तींकडे सोपवायचे होते असा जबाब महिलेने दिला आहे," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

त्या दोघांनाही अटक

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या महिलेने संदर्भ दिलेल्या अन्य दोन व्यक्तींना तातडीने विमानतळाच्या बाहेरुन अटक केली. "या महिलेसहीत अन्य दोन व्यक्तींना एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे," असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे तिघेच यामध्ये आहेत की मोठी टोळी कार्यरत आहे या दिशेने सध्या तपास सुरु आहे.