Crime News : तीन ठिकाणं, चौघांची टोळी आणि 157 जणांना कोटींचा चुना... फसवणुकीच्या प्रकाराने पोलिसही चक्रावले

Crime News : या चार आरोपींनी विरार, ठाणे, आझान मैदान या तीन ठिकाणी वेगवेगळी कार्यालये उघडून फसवणूक केली होती. तिन्ही ठिकाणी आरोपी वेगवेगळ्या नावाने लोकांची फसवणूक करत होते

Updated: Feb 16, 2023, 07:35 PM IST
Crime News : तीन ठिकाणं, चौघांची टोळी आणि 157 जणांना कोटींचा चुना... फसवणुकीच्या प्रकाराने पोलिसही चक्रावले title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार :  बँकेची सील घरे स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवत शेकडो ग्राहकांना चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये उघडकीस आला आहे. गुन्हे शाखा 3 च्या पथकाकडून चार जणांच्या टोळीला अटक केली आहे. तब्बल 157 ग्राहकांची फसवणूक करुन आरोपींनी त्यांच्याकडून 3 कोटी 75 लाख रुपये उकळले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बँकेच्या सील केलेल्या मालमत्ता व घरं स्वस्त दरात मिळून देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या आरोपींनी विरार पश्चिमेकडील बोळींज परिसरात ''बिडर्स विंनर्स'' या नावाने एक बोगस कार्यालय सुरु केले होते. या कार्यालयात आरोपी आपली नावे बदलून बॅंकांनी सील केलेली घरं स्वस्त दरात मिळून देण्याचे आमिष लोकांना दाखवत होते. यानंतर ग्राहकांकडून बुकिंगची रक्कम घेऊन आरोपींनी पळ काढला होता.

वसई विरारमधून आरोपी 40 लोकांची फसवणूक करत 80 लाख रोख घेऊन पसार झाले होते. यानंतर फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हे शाखा युनिट 3 ने चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एक महिला व दोन वकील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

परवेश शेख, साहेब शेख, प्रवीण ननावरे व हीना चुदेसरा अशी या आरोपींची नावे असून या आरोपींनी ठाणे येथे ''लॅण्ड लीडर'' नावाने कार्यालय सुरू करून 40 लोकांना 1 कोटी 20 कोटी रुपयांना चुना लावला होता. तर आजाझ मैदान येथे ''पाटील डिजिटल''नावाने कार्यालय सुरू करून 72 लोकांची 1 कोटी ७५ लाखांची फसवणूक केली होती. आरोपींवर ठाणे ,आझाद मैदान व विरारमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपींनी आतापर्यंत 157 लोकांची 3 कोटी 75 लाखांनी फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..

कशी व्हायची फसवणूक?

"ऑनलाईन प्रकारे ही फसवणूक झाली. जान्हवी नावाच्या मुलीने आम्हाला विरारला ऑफिसला या असे सांगितले. आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला जागा दाखवली आणि सर्व प्रक्रियेनंतर तीन महिन्यांनंतर फ्लॅट मिळतील असे सांगितले. त्यांनी साडेतीन लाख रुपये तीन टप्प्यांमध्ये देण्यास सांगितले. त्यांनी सर्व खोटी कागदपत्रे देऊन 15 दिवसांनी फोन येईल असे सांगितले. 15 दिवसांनी सगळ्यांचे फोन बंद झाले. अंधेरी येथे घर पाहण्यासाठी गेलो असता आम्हाला जाऊ दिले नाही. तेव्हा आम्हाला फसवणूक झाल्याची जाणीव झाली," असे फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने सांगितले.