मुंबई: मुंबई आणि उपनगराच्या परिसरात शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान खात्याने काही दिवसांपूर्वीच २६ जुलैला मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे.
आज सकाळपासून पाऊस थोडावेळ विश्रांती घेऊन बरसत होता. मात्र, दुपारपासून पावसाची नॉनस्टॉप बॅटिंग सुरु आहे. संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. याशिवाय, आकाशात विजांचा जोरदार कडकडाटही सुरु आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढून २६ जुलैसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
गेल्या काही तासांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. भांडुपच्या एलबीएस मार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा मोठ्याप्रमाणावर खोळंबा झाला आहे. तसेच ठाणे परिसरातही अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.
मात्र, सुदैवाने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकलसेवा अद्याप बऱ्यापैकी सुरळीतपणे सुरु आहे. मात्र, पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास लोकले सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील रस्ते वाहतुकीवर पावसामुळे वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे तानसा धरणापाठोपाठ मोडकसागर धरणही भरून वाहू लागले आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, भातसा, विहार आणि तुलसी या सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. यापैकी मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेले तुळशी हे धरण सर्वात आधी भरून वाहू लागले होते. १२ जुलै रोजी हे धरण भरले. त्यानंतर काल दुपारी २.५० वाजता तानसा धरण भरले होते. यानंतर आता मोडकसागर धरणही भरून वाहू लागले आहे.
लाईव्ह अपडेस्
* आगामी काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून दक्षतेचा इशारा
* बदलापूरमध्ये उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, शहरात पाणी शिरले
* मध्य रेल्वेचा कल्याणहून बदलापूरला जाणाऱ्या ट्रेन रद्द
* कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी
* बदलापूर रेल्वे स्थानकात रुळांवर साचले पाणी
* कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस
* एका तासाभरात अंधेरीत ३६ मिमी, दादरमध्ये २०, कुर्ल्यात २२ मिमी
* एमआयडीसी, मानपाडा, दावडी परिसरात पाणी साचले
* कल्याणच्या शिळफाटा परिसरात पाणी साचले
* पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपरजवळ वाहतुकीची कोंडी
* हवाई वाहतुकीलाही पावसाचा फटका; विमानांची उड्डाणे ३० मिनिटे उशिराने
* मध्य रेल्वेची वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने
* मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद
* ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या ५ मिनिटे उशिराने
* हार्बर रेल्वेमार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने
* पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
* सायन स्थानकात ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात; मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने
— Ridlr Mumbai (@RidlrMUM) July 26, 2019
Chembur Station Update https://t.co/C1E3SJxGJs
— Ridlr Mumbai (@RidlrMUM) July 26, 2019
* मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने
* दादर, माटुंगा आणि वडाळा भागातही पाणी साचण्यास सुरुवात
* मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात
* विक्रोळी, घाटकोपर आणि भांडूप परिसरात जोरदार पाऊस; एलबीएस मार्गावर वाहतुकीची कोंडी
* गेल्या दोन तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस