मुंबई: मुंबईत रविवारी सकाळपासून संततधार गतीने पाऊस सुरु होता. मात्र, दुपारपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. विशेषत: पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे मालाड, अंधेरी यासारख्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
दुपारी अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांची चांगली त्रेधातिरपिट उडाली. तर सखल भागांत पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेसेवाही कोलमडली आहे. या दोन्ही मार्गावरील ट्रेन्स १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट आहे. तांत्रिक कारणामुळे अप मार्गावरील करीरोड आणि चिंचपोकळी या स्थानकांवर ट्रेन थांबत नाहीत. मात्र, डाऊन दिशेची वाहतूक तुर्तास व्यवस्थित सुरु आहे.