हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर; पावसाळ्यात खोळंबा टळणार

पावसाळ्यात रुळावर पाणी साचून रेट्रोफिटेड कंपनीच्या लोकल ठप्प होतात.

Updated: Jun 25, 2019, 11:23 PM IST
हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर; पावसाळ्यात खोळंबा टळणार title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: हार्बर मार्गवर सर्व लोकल सिमेन्स लोकल धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील जुन्या रेट्रोफिटेड बनावटीच्या लोकल बाद झाल्या असून या लोकल भंगारात जाण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावर सध्या ४० लोकल असून, या लोकलच्या ६१२ फेऱ्या चालविण्यात येतात. रेट्रोफिटेडच्या लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना त्रासदायक होत होते. त्यामुळे प्रवाशांच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे हार्बर रेल्वेकडून सर्व लोकल सिमेन्स कंपनीच्या चालविण्यात येत आहे. 

या सिमेन्स लोकलमुळे पावसाळ्यात बंद पडणार नाहीत, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. पावसाळ्यात रुळावर पाणी साचून रेट्रोफिटेड कंपनीच्या लोकल ठप्प होतात. त्यामानाने सीमेन्स बनावटीच्या लोकल साचलेल्या पाण्यातून चालवता येऊ शकतात. 

सिमेन्स लोकलची बांधणी आधुनिक पद्धतीने असल्यामुळे खिडक्या आणि दरवाजे मोठ्या आकाराचे असणार आहेत. या लोकलचा वेग ८० ते १०० किमी असल्याने दोन स्थानकांमधील अंतर कमी वेळात पार करणे शक्य झाले आहे. दिवसभरात एक रेक साधारणपणे १० फेऱ्या पूर्ण करतात. यामुळे वेळापत्रकाची चाचपणी करून फेऱ्या वाढवण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. 

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मुख्य मार्गावर नव्या लोकल गेल्या काही वर्षांत दाखल झाल्या त्या तुलनेत हार्बर मार्ग उपेक्षितच राहिला. मात्र, आता हार्बर रेल्वे प्रवाशांना नवीन सिमेन्स लोकलचा दिलासा मिळाला आहे.