मोठी बातमी: राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण

विधानसभेची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना राज्यपालांकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Updated: Nov 9, 2019, 08:33 PM IST
मोठी बातमी: राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण title=

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभेची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना राज्यपालांकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापनेचा दावा करेल. यानंतर भाजप सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती तेव्हा बहुमत असल्याशिवाय आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आता राज्यपालांच्या आमंत्रणानंतर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी २०१४ मध्येही भाजपने अल्पमतातील सरकार स्थापन केले होते. यानंतर सभागृहातील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, यंदा शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून ताठऱ भूमिका घेतल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला नव्हता. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी अस्पष्टता निर्माण झाली होती. विधानसभेची मुदत संपल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याची शक्यताही वर्तविली जात होती.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा दावा केला होता. मात्र, भाजपकडे अवघ्या १०५ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमतासाठी लागणारा १४५ चा आकडा भाजप कसा गाठणार, हा यक्षप्रश्न आहे. कर्नाटक आणि गोव्याप्रमाणे भाजप आमदारांची फोडाफोडी करेल, अशी शक्यताही सुरुवातीला वर्तविण्यात येत होती. मात्र, भाजप कोणतीही फोडाफोडी करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता भाजप राज्यपालांचे निमंत्रण स्वीकारून सत्तास्थापनेचा दावा करणार का?, हे पाहणे रंजक ठरेल. 

तर दुसरीकडे शिवसेनेकडून पडद्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी सुरु आहेत. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यास राज्यपाल आघाडीला निमंत्रण देणार का?, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातलं पक्षीय बलाबल

भाजपा १०५

शिवसेना ५६

राष्ट्रवादी ५४

काँग्रेस ४४ 

बहुजन विकास आघाडी ३

एमआयएम २

समाजवादी पार्टी २

प्रहार जनशक्ती पार्टी २

माकप १ 

जनसुराज्य शक्ती १

क्रांतिकारी शेतकरी पार्टी १

महाराष्ट्र नवनिर्माण सेना १ 

राष्ट्रीय समाज पक्ष १ 

स्वाभिमानी पक्ष १

अपक्ष १३