शपथ देताना राज्यपाल का म्हणाले, 'आगे पिछे कुछ नही बोलनेका?'

महाराष्ट्र विकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला.

जयवंत पाटील | Updated: Dec 30, 2019, 02:52 PM IST
शपथ देताना राज्यपाल का म्हणाले, 'आगे पिछे कुछ नही बोलनेका?' title=

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. नव्या कॅबिनेट तसेच राज्यमंत्र्यांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शपथ घेणाऱ्या सदस्यांवर ते काय बोलतात याकडे करडी नजर होती. शपथ देण्याआधी किंवा शपथ घेताना ठरलेल्या अधिकृत मजकूरापेक्षा वेगळं कुणी काही बोलत असेल,  तर 'आगे पिछे कुछ नही बोलनेका?' असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बजावत होते. काँग्रेसचे अक्कुलकुवा येथील आमदार केसी पाडवी यांना राज्यपालांनी पुन्हा शपथ घेण्यास विनंती केली. यानंतर केसी पाडवी यांनी पुन्हा शपथविधीच्या अधिकृत नमुन्याप्रमाणे शपथ घेतली.

शपथ घेताना कोणते सदस्य काय म्हणाले...

हसन मुश्रीफ - जय सिमाभागासह संयुक्त महाराष्ट्र
वर्षा गायकवाड - भारताच्या संविधानाचे शिल्पकार
राजेंद्र शिंगणे - जय जिजाऊ
के सी पाडवी - येथे मी निसर्गाला व मानवतावादाला नतमस्तक होतो, तसेच सात वेळा निवडून देणाऱ्या मतदारांना तसेच महाराष्ट्रासह सर्व भारतीय जनतेला वंदन करतो. तसेच भारतीय राज्यघटना ... अर्पण करतो. ( यावर आक्षेप घेत राज्यपालांनी केसी पाडवी यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले, आणि त्यांनी पुन्हा अधिकृत नमुन्यात शपथ घेतली)

राज्यपाल म्हणाले,  'आगे पिछे कुछ नही बोलनेका?'

कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांनी आपली शपथ संपवताना, तर वर्षा गायकवाड यांनी ठरलेल्या अधिकृत मजकुराच्या नमुनापेक्षा सुरूवातीला बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, 'आगे पिछे कुछ नही बोलनेका?' तसेच अक्कलकुवाचे काँग्रेस आमदार केसी पाडवी यांनी शपथविधीच्या अधिकृत मजकुरापेक्षा अधिक शब्द शपथविधीत वापरल्यावर राज्यपालांनी आक्षेप घेतला आणि शपथ पुन्हा घेण्याची विनंती केली यानंतर केसी पाडवी यांनी पुन्हा अधिकृत मजकुराप्रमाणे, नमुन्याप्रमाणे शपथ घेतली.

केसी पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली

केसी पाडवी यांना पुन्हा शपथ घेण्याची विनंती करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, प्लिज ऐसा नही चलेगा, आप फिर से पढीए, सामने शरदजी भी बैठे है, ऐसा नही चलेगा, आप फिर से पढीए, तेव्हा के सी पाडवी यांनी पुन्हा शपथ घेतली.

नेत्यांच्या नावावर यापूर्वीच आक्षेप

यापूर्वी मंत्रिमंडळाच्या शपथविधीत सदस्यांनी महापुरूषांची नावं घेतली होती, तर अनेकांनी सोनिया गांधी तसेच शरद पवार यांचं देखील शपथ घेताना नाव घेतलं होतं, त्यावर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. आता आजच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीस काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

यापूर्वी अधिकृत नमुन्याशिवाय नाव घेण्यावर भाजपचा आक्षेप

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपलं मत व्यक्त करताना म्हटलं होतं, शिवाजीमहाराज किंवा इतर महापुरूषांच्या नावाला आमचा विरोध नाही, एक अधिकृत मजकुराचा नियम पाळला जावा, शिष्टाचार पाळला जावा, संविधानात स्पष्ट लिहिलं आहे की, राज्यपाल जेव्हा मैं किंवा मी म्हणतील त्यानंतर जो अधिकृत नमुना दिला आहे, तो मजकूर वाचवण्यात यावा, नाहीतर ती शपथ अवैध मानली जाते, यामागे शिष्टाचार पाळण्यात यावा हा उद्देश असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.