बातमी तुमच्या कामाची! खासगी नोकरदारांसाठी खुशखबर, 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार पगार

आर्थिक गाडं पूर्वपदावर येत असतानाची परिस्थिती निर्माण झाली असतानाच नोकरी करणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत 

Updated: Jan 28, 2022, 08:03 PM IST
बातमी तुमच्या कामाची! खासगी नोकरदारांसाठी खुशखबर, 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार पगार title=

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातलं. अनेक व्यवसाय, कंपन्या ठप्प झाल्या. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.  हाताला काम नसल्याने अनेकांनी शहर सोडून गावाकडची वाट धरली.

आता तब्बल दोन वर्षांच्या काळानंतर हळूहळू का होईना परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसतेय. अशातच आता खासगी नोकरदारांसाठी एक खूशखबर आहे. आर्थिक गाडं पूर्वपदावर येत असतानाची परिस्थिती निर्माण झाली असतानाच नोकरी करणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आणि याचं कारण आहे  कॉर्न फेरी  या ग्लोबल कन्सल्टींग कंपनीनं नुकताच जाहीर केलेला रिपोर्ट.

या रिपोर्टनुसार कोरोनाचा प्रभाव कमी  होत असतानाच मार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्येक क्षेत्रात आता तेजीचे वारे वाहू लागायला सुरवात झाल्यानं कंपन्या आर्थिकदृष्ट्या  पूर्वपदावर येऊ लागला आहेत. आणि याचा फायदा होणार आहे तो कर्मचाऱ्यांना. 

प्री कोविड काळात म्हणजेच २०१९ मध्ये  जिथे पगारात  सव्वा नऊ  टक्क्यांची वाढ झाली होती तिथे कोविड काळात हा आकडा सातवर गेला होता. तर गेल्या वर्षी ८.४ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. मात्र या वर्षी यात आणखी दोन ट्क्यांची वाढ होणं अपेक्षित आहे.

कोरोना काळानंतर ग्राहकांचा आत्मविश्वास  दुणावला आहे  आणि त्याचा थेट परिणाम कंपनीच्या कामावर आणि त्यांच्या फायद्यावर होत आहे. जवळपास ४६ टक्के कंपन्या पगारवाढीच्या बरोबरच  कर्मचाऱ्यांना इतरही काही फायदे देण्याच्या विचारात आहेत. तर दुसरीकडे तब्बल ६० टक्के कंपन्या वर्क फ्रॉम होममुळे वायफायसोबतच वीजबिलाचा खर्चही एक्स्ट्रा पर्क म्हणून द्यायची तयारी दर्शवली आहे. 

एकीकडे ४० टक्के कर्मचारी आपली नोकरी बदलण्याच्या तयारीत असताना पगारवाढ देऊन या कर्मचाऱ्यांना याच नोकरीवर थांबवण्याठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. क्षेत्रच बघायची झाली तर  सर्वात फायदेशीर आहेत टेक कंपन्या. साहजिकच या कर्मचाऱ्यांना साडेदहा  टक्यांपर्यंत पगार वाढ मिळू शकते तर  त्याखालोखाल कन्झ्युमर्स क्षेत्राशी संबंधित कंपन्या दहा टक्यापर्यंत लाईफ सायन्स कंपन्यांशी संबंधित कर्मचाऱ्यांना साडे नऊ तर ऑटो-केमिकल कंपन्यांशी संबंधित कर्मचाऱ्यांना नऊ टक्क्यांपर्यंत पगारवाढ मिळू शकते.