मुंबईकरांसाठी गूड न्यूज! कोस्टल रोड वर्षाअखेरीस सुरू होणार

 हा कोस्टल रोड मलबार हिलला भुयारी होणार आहे आणि वॉर्डन रोडवरच्या प्रियदर्शनी पार्कच्या ठिकाणी पुन्हा जमिनीवरुन येणार आहे. त्यानंतर पुढे हा कोस्टल रोड हाजीअली मार्गे वरळी वांद्रे सी लिंकला जोडला जाणार आहे. पुढे ओशिवराच्या जवळ कोस्टल रोडचा उन्नत मार्ग होणार आहे. ओशिवरा ते मालाड दरम्यान हा कोस्टल रोड उन्नत असणार आहे. कांदिवलीला हा मार्ग संपणार आहे.

वनिता कांबळे | Updated: May 1, 2023, 08:44 PM IST
मुंबईकरांसाठी गूड न्यूज! कोस्टल रोड वर्षाअखेरीस सुरू होणार title=

Mumbai Coastal Road Project : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला कोस्टल रोड लवकरच पूर्णत्वास येणार आहे. मुंबईचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड वर्षाअखेरीस सुरू होणार आहे.  कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.कोस्टल रोड वर्षाअखेरीस सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज महापालिक आयुक्त इक्बालसिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्यासमवेत कोस्टल रोडच्या ( Coastal Road) कामाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी ही महिती दिली. 

मेट्रो 6 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरु होणार

महाराष्ट्र दिनानिमित्त शिंदे फडणवीस सरकारने मुंबईकरांसाठी गूड न्यूज दिली आहे.  कोस्टल रोड सह मेट्रो 6 लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मेट्रो 6 चं काम अंतिम टप्प्यात आलं असून नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरु होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो 6 ही विक्रोळी ते जोगेश्वरीदरम्यान धावणार आहे. या मार्गावर 13 स्टेशन्स असतील तर हा मार्ग जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडला समांतर असेल.. या मार्गादरम्यान मेट्रो 6 विक्रोळी आणि जोगेश्वरी स्थानकांना तसंच मेट्रो 2 अ लाही जोडली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार काम 66 टक्के पूर्ण झाले आहे. तर, कारशेडसाठी कांजूरची जमीन मिळाल्यानं पुढच्या कामांनीही वेग पकडला आहे.

मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट आणि मस्त होणार

मुंबईतला सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कोस्टल रोडकडे पाहिलं जातं. समुद्रकिना-याच्या साथीनं जाणा-या या मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट आणि मस्त होणार आहे.  कोस्टल रोड मरीन लाईन्स आणि कांदिवलीला जोडणारा आहे.  29.2 किमीचा रस्ता मुंबईला भविष्यात आणखी वेगवान करणार आहे. दीडशे अब्जांचा हा प्रकल्प आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाला हा उत्तम पर्याय आहे.  Manora हॉस्टेलपासून हा मार्ग सुरू होणार आहे. हा कोस्टल रोड मलबार हिलला भुयारी होणार आहे आणि वॉर्डन रोडवरच्या प्रियदर्शनी पार्कच्या ठिकाणी पुन्हा जमिनीवरुन येणार आहे. त्यानंतर पुढे हा कोस्टल रोड हाजीअली मार्गे वरळी वांद्रे सी लिंकला जोडला जाणार आहे. पुढे ओशिवराच्या जवळ कोस्टल रोडचा उन्नत मार्ग होणार आहे. ओशिवरा ते मालाड दरम्यान हा कोस्टल रोड उन्नत असणार आहे. कांदिवलीला हा मार्ग संपणार आहे.

मरीन लाईन्स ते कांदिवली या 29 किलोमीटरच्या मार्गावर 18 एन्ट्री आणि एक्झिट पॉईण्ट असणार आहेत. आठ मार्गिकांचा हा मार्ग असणार आहे.  त्यातल्या दोन मार्गिका बससाठी राखीव असणार आहेत. दोन टप्प्यांमध्ये कोस्टल रोड बांधला जाणार आहे. मरीन लाईन्स ते वरळी पर्यंतच्या टप्प्याचं काम आधी केलं जाईल. 2019 पर्यंत हा मार्ग पूर्ण होणं अपेक्षित होते. मात्र, कोरोनाकाळात याचे काम मंदावले होते. पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर दुस-या टप्प्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. या कोस्टल रोडमुळे चर्चगेट ते बोरीवली या मार्गावरची वाहतुकीची कोंडी आणि प्रवासाला लागणारा वेळ दोन्ही कमी होणार आहे.