मुंबई : परदेशी बाजारात आलेल्या घसरणीच्या संकेतांमुळे, देशांतर्गत वायदे बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत एक टक्का आणि चांदीच्या किंमतीत दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. चांदीच्या किंमतीत एक हजार रुपये प्रतिकिलोहून अधिक घसरण झाली आहे.
फेब्रुवारी २०२०च्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात वायदे बाजारात (Commodity Market) रात्री ९.३० वाजता सोन्याच्या किंमतीत गेल्या सत्राहून ३७९ रुपये म्हणजे एक टक्क्याची घसरण होत, सोन्याचा दर ३७ हजार ७०६ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला. तर यापूर्वी फेब्रुवारी २०२०च्या आधीच्या सत्रात सोन्याचा दर, ३७ हजार ६८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता.
चांदीच्या मार्च २०२०च्या वायदे बाजारातील दर ९५९ रुपये म्हणजे २.१५ टक्क्यांच्या घसरणीसह ४३ हजार ६५१ रुपये प्रति किलो इतका होता. तर, व्यवसायादरम्यान चांदीचा दर ४३ हजार ४७० रुपये प्रति किलो होता.
अमेरिकेमध्ये, नोव्हेंबर महिन्यात रोजगाराचे आकडे अपेक्षेहून अधिक चांगले आल्यानंतर, महागड्या धातुंच्या किंमतीत घसरण झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ३७ हजार १०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ३८ हजार १०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. मुंबईत एक किलो चांदीचा दर ४७ हजार ५०० रुपये इतका आहे.