मुंबई : पावसाच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच मुंबई महापालिकेने देखील पाच लाखाची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या आपत्कालीन विभागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मालाडमध्ये भिंत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आम्ही शाळा, महाविद्यालय, कार्यालयांना आम्ही सुटी दिल्याचे त्यांनी सांगितले. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात आले आहे. पालिका प्रशासन आणि पोलीस विभाग यावर काम करत आहेत. पुढील ३ ते ४ दिवस मुंबईला पावसाचा धोका आहे. साधारण १६०० ट्विट मुंबई पोलीसांना आले असून त्यावर काम सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत पाणी तुंबले नसल्याच्या महापौरांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.राजकारण करण्याची ही वेळ नसून तुर्तास मुंबईतील परिस्थितीवर लक्ष देऊया असे ते म्हणाले.
दोन पंपिग स्टेशन अद्याप सुरु झाले नसून यामुळे संबंधित ठिकाणी पाणी साचल्याचे ते म्हणाले. त्याची चौकशी करणार असल्याचेही ते म्हणाले.