'कोरोनाच्या मृत्यूचे आकडे ४८ तासात द्या, अन्यथा..' मुंबई मनपाचा हॉस्पिटलना इशारा

कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या माहितीबाबत मुंबई महापालिका आयुक्तांनी हॉस्पिटलना इशारा दिला आहे. 

Updated: Jun 18, 2020, 10:51 PM IST
'कोरोनाच्या मृत्यूचे आकडे ४८ तासात द्या, अन्यथा..' मुंबई मनपाचा हॉस्पिटलना इशारा title=

मुंबई : कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या माहितीबाबत मुंबई महापालिका आयुक्तांनी हॉस्पिटलना इशारा दिला आहे. सर्व हॉस्पिटलनी येथून पुढे ४८ तासात त्यांच्याकडच्या कोव्हिड रुग्णांच्या सर्व मृत्यूंची नोंद करावी. ४८ तासानंतर नोंद केल्यास संबंधित हॉस्पिटलवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिला आहे. मुंबईतल्या ८६२ कोरोना रुग्णांच्या मृत्यू प्रकरणानंतर मुंबई महापालिका आयुक्तांनी नवीन परिपत्रक काढून हॉस्पिटलना हा इशारा दिला आहे. 

मुंबईत आणि राज्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रही पाठवलं होतं. यानंतर  प्रशासकीय यंत्रणांकडून मुंबईतील ८६२ आणि राज्यातील ४६६ कोरोना मृतांचे आकडे नव्याने जाहीर करण्यात आले.

कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. मात्र, या समितीने आयसीएमआरच्या गाईडलाईन्स डावलून काही कोरोना मृतांचे आकडे दडवले होते, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. 

‘डेथ ऑडिट कमिटी’ने कोणाच्या दबावाखाली हे कृत्य केले, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या मृत्यूचे दडवून ठेवलेले आकडे अखेर समोर आले आहेत. मात्र, आता या प्रक्रियेला फेरतपासणीचे गोंडस नाव देण्यात आले आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून मृतांची खरी आकडेवारी लपवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.