बॅण्डस्टँडला महिला समुद्रात वाहून गेल्यानंतर आणखी एक दुर्घटना! मार्वे बीचवर 5 शाळकरी मुलं बुडाली

Marve Beach Mishap: पावसाळ्यात मुंबईतील अनेक ठिकाणी लोक जीव धोक्यात टाकत पाण्यात उतरत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतंच वांद्र्यात एक दांपत्य पाण्यात वाहून गेल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यातच आता मुंबईतील मार्वे बीचवर 5 मुलं बुडाली आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 16, 2023, 01:38 PM IST
बॅण्डस्टँडला महिला समुद्रात वाहून गेल्यानंतर आणखी एक दुर्घटना! मार्वे बीचवर 5 शाळकरी मुलं बुडाली title=

Marve Beach Mishap: पावसाळ्यात मुंबईतील अनेक ठिकाणी लोक जीव धोक्यात टाकत पाण्यात उतरत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतंच वांद्र्यात एक दांपत्य पाण्यात वाहून गेल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यातच आता मुंबईतील मार्वे बीचवर 5 मुलं बुडाली आहेत. यामधील दोघांना वाचवण्यात आलं असून, तिघांचा शोध अद्याप सुरु आहे. 

उसळलेल्या समुद्रात फोटोशुट करणं पडलं महागात, मुलाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आईच्या मृत्यूचा व्हिडिओ

 

मालाड पश्चिम मार्वे क्रीक याठिकाणी समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या 12 ते 16 वयोगटातील 5 मुले समुद्राच्या किना-यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर बुडाली. त्यापैकी 2 मुले कृष्ण जितेंद्र हरिजन (16) आणि अंकुश भारत शिवरे (13) यांना स्थानिक लोकांनी बचावलं आहे. मात्र यातील सुभम राजकुमार जैस्वाल (12), निखिल साजिद कायमकूर (13), अजय जितेंद्र हरिजन (12) हे तीन विद्यार्थी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. 

 

दरम्यान, नुकताच वांद्रेमधील बॅण्डस्टॅण्ड येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक विवाहित जोडपं समुद्राच्या लाटांची मजा घेत दगडावर बसले होते. यावेळी त्यांची मुलगी त्यांचा व्हिडीओ शूट करत होती. व्हिडीओत मुलांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. समुद्रात लाटा उसळत असताना दोघेही दगडांवर बसले होते आणि एकमेकांना पकडलं होतं. पण त्यानंतर एक जोराची लाट येते आणि दांपत्य पाण्यात बुडतात. पण यावेळी पती वाचतो आणि महिला समुद्राच्या पाण्यात वाहून जाते. मुलगी यावेळी 'मम्मी, मम्मी....' असं ओरडत होती. व्हिडीओत हा आवाजही रेकॉर्ड झाला आहे. ज्योती सोनार अशी या महिलेची ओळख पटली आहे. त्या 32 वर्षांच्या होत्या. 

महिलेची पती मुंबईच्या रबाळे परिसरात एक कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करतो. मुकेश असं त्याचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, "मी तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मागून आलेल्या चौथ्या लाटेने आमचं नियंत्रण गेलं आणि दोघं घसरलो. मी माझ्या पत्नीची साडी पकडली होती. एका व्यक्तीने माझा पाय पकडला. पण मी तिला वाचवू शकलो नाही. मी तिला अत्यंत मजबूतपणे पकडलं होतं. पण तरीही तिची साडी हातातून सुटली आणि माझ्यासमोर ती समुद्रात वाहून गेली. माझी मुलं तिथेच होती. ते मदतीसाठी ओरडत होते. पण काहीच होऊ शकलं नाही. या घटनेतून मी बाहेर कसा येईन हे मला माहिती नाही".