कर्मचाऱ्यांची ऐन पावसाळ्यात दिवाळी; सातव्या वेतन आयोगाची थकबाकी लवकरच

 मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Updated: Jul 17, 2022, 10:07 AM IST
कर्मचाऱ्यांची ऐन पावसाळ्यात दिवाळी; सातव्या वेतन आयोगाची थकबाकी लवकरच title=

मुंबई : कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सातव्या वेतन आयोगाचा अंतिम करार लवकर करण्यात येणार आहे. यात डबल धमाका म्हणजे या करारासोबत पाचवा आणि शेवटचा थकबाकीचा हप्ताही मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना जवळपास 25 ते 80 हजारांपर्यंत थकबाकी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पालिका कर्मचाऱ्यांना 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. तसंच त्याची अंमलबजावणी 2018 पासून सुरु झाली. आतापर्यंत आयोगाकडून कर्मचाऱ्यांना 4 थकबाकी मिळाल्या आहेत. पण शेवटची थकबाकीसाठी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांची ही मागणी मान्य झाला आहे. तसंच जानेवारी 2020 ते जुलै 2021 पर्यंत वाढलेल्या महागाई भत्त्याची थकबाकी संदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याकरिता 22 जुलैला पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याशी चर्चा होणार आहे. 

विशेष म्हणजे सहाव्या आणि सातव्या वेतन आयोग अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठीही महत्त्वपूर्ण घेण्यात आला आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी रामनाथ झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी 15 दिवसात एका समितीचं गठन करण्यात येणार आहे.  तर या समितीसमोर ग्रेड पे आणि श्रेणी वेतन 40 टक्के करण्याच्या मागणीवर सुनावणी होणार आहे. कामगार संघटनेच्या इतर मागण्यावर पण ही समिती विचार करणार आहे. कालबद्ध पदोन्नतीची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 1994पासून करण्यात यावी अशी कामगारांची मागणी आहे. तर आश्वासित प्रगती योजना सुद्धा ऑगस्ट 2001 पासून लागू करा अशी मागणी कामगार संघटना या समितीसमोर ठेवणार आहेत.