निर्णय तर घेतलेत पण अंमलबजावणीही होऊ द्या; शिवसेनेचा सरकारला सल्ला

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ निर्णय घेण्यात आले.

Updated: Aug 30, 2019, 07:37 AM IST
निर्णय तर घेतलेत पण अंमलबजावणीही होऊ द्या; शिवसेनेचा सरकारला सल्ला title=

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून नुकत्याच काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. यामध्ये समाजातील विविध घटकांना मोठमोठी आश्वासने देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या घोषणांचे आगामी काळात विसर्जन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून यासंदर्भात टिप्पणी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ निर्णय घेण्यात आले. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने या घोषणांना राजकीय रंग दिला जात आहे. मात्र, या सगळ्याला विधानसभा निवडणुकीचे शेपूट लावण्याची गरज नाही. 

टीका करणे विरोधकांचे आणि योग्य टीका, सूचना विचारात घेऊन जनहिताची कामे करत राहणे हे सरकारचे काम असते. त्यामुळे राज्य सरकारने विघ्नहर्ता गणरायांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक घोषणांचा 'बाप्पा मोरया' केला हे चांगलेच झाले. फक्त निवडणूक आचारसंहितेच्या लोंढ्यात त्यांच्या अंमलबजावणीचे विसर्जन होणार नाही याची काळजी घ्यावी इतकेच, असे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे आता सरकार आपल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी कशाप्रकारे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणाही गणेशोत्सवानंतर झाली होती. त्यावेळी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि आचारसंहिता १२ सप्टेंबर रोजी लागली होती. तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. यावेळीही मतदान आणि मतमोजणीची तारीख त्याच्या जवळपासच असण्याची शक्यता आहे.