अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : (Loksabha Election 2024) लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानतंर भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चिन्ह दिसू लागलेली असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ज्या शिवसेनेतून वेगळं होत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला उदयास आणलं आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्हंही मिळवलं त्याच शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या संपर्कात असणाऱ्या त्या आमदारांचा लवकरच पक्षप्रवेशही होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या माहितीमुळं राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांना उधाण आलं असून, नव्या समीकरणांनी डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Results 2024) लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळाल्यानंतर काही राजकीय समीकरणं बदलणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. ज्यानंतर हे वृत्त समोर आल्यामुळं या चर्चांना आणखी वाव मिळाला आहे. मविआच्या बाजूनं राज्यातील जनतेनं कौल देत महायुतीला हा मोठा धक्का ठरल्यानं शिंदे गटातील काही आमदार ठाकरे गटाकडे परतणार असल्याचं सांगितलं जात आहे.
लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत अनेक हालचाली पाहायला मिळत असून, ठाकरेंच्या संपर्कात असणाऱ्या आमदारांची लवकरच घरवापसी होईल अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, सदर बातमीसंदर्भात ठाकरे गटातील आमदार सचिन अहिर यांनी झी 24 तासशी संवाद साधताना फक्त शिवसेनाच नव्हे, तर इतरही पक्षातील मागे राहिलेले आमदार अस्वस्थ झाल्याची बाब स्पष्ट केली.
'पक्षाला अद्याप कोणी अधिकृत संपर्क केलेला नाही आणि आम्हीही त्यांच्या संपर्कात येऊ इच्छित नाही, असं सांगत आम्ही त्यांच्यासाठी सर्व दरवाजे बंद केल्याचं अहिर यांनी सांगितलं. पण, भविष्यात अनेकजण पक्षाच्या संपर्कात येऊ शकतात अशी परिस्थिती असली तरीही आम्ही निष्ठावान शिवसैनिकांना सोबत घेऊन निघालो होतो आणि म्हणून प्राधान्य हे त्यांनाच राहील आणि पक्षाच्या भूमिकेसमवेत यासंदर्भातील निर्णयावर पक्षश्रेष्ठी बोलतील' असं म्हणत त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या.
दरम्यान, आमदार परतण्याची शक्यता नाही, असं म्हणताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्या ला आधार घेत आमदारांच्या मनातील असंतोष अधोरेखित केला. 'विधानसभेचं जागावाटप होईल, तेव्हा आपल्या वाट्याला नेमक्या किती जागा येतील यावरही पुढील घडामोडी (आमदारांचे निर्णय) अवलंबून असतील, कदाचित ते एकत्र लढतील किंवा नाही लढतील... अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ज्यांचा दोष नव्हता, अशांची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली आणि त्यामुळं ज्यांनी पक्ष सोडला आणि आता ते परत येऊ इच्छित असतील तर त्यांच्या घरवापसीसंदर्भात विचार केला जाऊ शकतो' असे संकेत अंधारे यांनी दिले. यावेळी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांना मात्र पक्षात स्थान मिळणार नसल्याचंही त्यांनी अधिकच कठोर स्वरात स्पष्ट केलं. ज्यामुळं आता भविष्यातील राजकीय घडामोडींवर साऱ्या राज्याचं आणि देशाचंही लक्ष राहणार आहे हे नाकारता येत नाही.