Maharahstra Political Crisis : महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना गुवाहाटीत हॉटेल रॅडिसनमध्ये आपल्या समर्थकांसह असलेले एकनाथ शिंदे यांनी आज हॉटेलबाहेर येत मीडियाशी संवाद साधला. खोटी माहिती, दिशाभूल करण्याचं काम समोरचे लोक करत आहे. त्यावर विश्वास ठेऊ नका. इथे 50 लोकं आहेत, स्वत:च्या मर्जीने आले आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी इथे कोणीही आलेले नाहीत, हिंदुत्वाची भूमिका, बाळासाहेबांची भूमिका घेऊन याठिकाणी आलेले आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
प्रवक्ता दीपक केसरकर हे आमची भूमिका तुमच्यापर्यंत वारंवार पोहचवत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाचा मु्द्दा आम्ही पुढे घेऊन जात आहे. आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेना पुढे घेऊन जात आहोत, यात कोणतीही शंका नाही.
आमची पुढची भूमिका काय असेल यासंदर्भात आम्ही माहिती देऊ. इथे जेवढे आमदार आहेत ते सर्व आनंदात आहेत, जी माहिती बाहेरुन येतेय, आमच्याबरोबर येवढे संपर्कात आहेत, तेवढे संपर्कात आहेत, कृपया त्यांनी नावं सांगावी आणि मग त्याची स्पष्टता होईल.