मुंबई: येस बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राणा कपूर यांच्याकडील एका अतिमहागड्या पेटिंगची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) सध्या या पेटिंगची चौकशी सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राणा कपूर यांनी २०१० साली काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढ्रा यांच्याकडून हे पेटिंग विकत घेतले होते. एम.एफ. हुसेन यांनी काढलेले हे चित्र प्रियांका गांधी यांनी तब्बल दोन कोटी रुपयांना विकले होते.
'ईडी'च्या चौकशीदरम्यान या पेटिंगबाबत आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या मध्यस्थीने हा व्यवहार झाला होता. त्यांनीच राणा कपूर यांना हे पेटिंग विकत घेण्यासाठी राजी केले होते. त्यावेळी या चित्राचा बाजारभाव कोणालाच माहिती नव्हता. मात्र, राणा कपूर यांनी दोन कोटी रुपये देऊन हे पेटिंग विकत घेतले. विशेष म्हणजे राणा कपूर यांनी प्रियांका गांधी यांच्या सचिवाकडे एक धनादेश पाठवला होता. यानंतर प्रियांका गांधी यांनीच त्या पेंटिंगची किंमत ठरवली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
YES Bank : राणा कपूरच्या मुलीला विमानतळावरच रोखलं
सध्या 'ईडी'कडून राणा कपूर यांनी विविध ठिकाणी गुंतवलेल्या पैशांची कसून चौकशी सुरु आहे. त्यामुळे हे पेटिंग 'ईडी'च्या रडारवर आल्याचे म्हटले जाते. काँग्रेसच्या शताब्दी सोहळ्यात प्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसेन यांनी हे पेटिंग राजीव गांधींना भेट म्हणून दिले होते.
दरम्यान, राणा कपूर यांच्याकडे अशाप्रकारची ४० महागडी पेटिंग असल्याची माहिती आहे. यापैकी प्रत्येक पेटिंग विकत घेताना राणा कपूर तज्ज्ञांकडून त्यांचे मूल्यमापन करवून घेत असत. केवळ प्रियांका गांधी यांनी विकलेल्या पेटिंगचेच प्रमाणपत्र राणा कपूर यांनी तयार करून घेतले नव्हते.