लॉकडाऊन काळात सर्वात जास्त ऑनलाईन चोरी, गुन्ह्यांची संख्या एवढी वाढली

कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारांमध्ये आतापर्यंत अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.

Updated: Jun 6, 2021, 10:14 PM IST
लॉकडाऊन काळात सर्वात जास्त ऑनलाईन चोरी, गुन्ह्यांची संख्या एवढी वाढली title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई  : कोरोनामुळे अनेक जणांनी आपला रोजगार गमावला. घर खर्च चालवण्यापासून ते अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण या वैश्विक संकटातही ऑनलाईन चोरट्यांचा धंदा तेजीत असल्याचं उघड झालं आहे. कोरोना काळात मुंबईतील सायबर सेलकडे 777 गुन्ह्यांची नोंद झाल्याचं समोर आलं आहे. (During the Corona period 777 cases of fraud in online transactions were registered with the Mumbai Cyber ​​Department) 

गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजीटल पेमेंट अॅपचा वापर केला जातो. तसेच व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्डही वापरला जातो. त्यामुळे बऱ्यापैकी व्यवहार हे ऑनलाईन होतात. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या भामट्यांनी ऑनलाईन व्यवहारांमध्ये अनेकांना लाखोंचा गंडवलं आहे. कोरोना संकटात गरीब, श्रीमंत सगळेच हतबल झाले आहेत. कोरोनावर उपचारासाठी औषधे मिळत नाहीत. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या भामट्यांनी इथेच संधी साधली. भामट्यांनी  संधी साधत अनेक गरजूंना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.  

ऑनलाईन पैसे पाठवा, ऑक्सिजन सिलेंडर पाठवतो. रेमेडिसिव्हर औषधही घरपोच पाठवतो, अशी बतावणी करुन अनेकांना फसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आले आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार 30 एप्रिलपर्यंत सायबर फसवणुकीचे 777 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील आतापर्यंत केवळ 11 टक्के प्रकरणे निकाली निघाली आहेत. म्हणजे फक्त  84 गुन्हे उघडकीस आले आहेत.

मुंबईतील आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 181 प्रकरणे क्रेडीट कार्ड आणि ऑनलाईन फसवणुकीची आहेत. अश्लील एसएमएस आणि ई-मेलच्या 78 घटना घडल्या आहेत. याशिवाय मॉर्फिंग ई-मेल आणि बनावट सोशल मीडिया प्रोफाईलचे 18 गुन्हे, फिशिंगचे 4 छेडछाडीचे 2 आणि बनवाबनवीचा 1 गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गरजवंताला अक्कल नसते असं म्हटलं जातं. त्याचाच फायदा या भामट्यांच्या टोळींनी घेतला आहे. पण आपण सावध राहिलो तर फसवणूक टाळता येणं शक्य आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना जागृत राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 

संबंधित बातम्या : 

राज्यात कोरोना रुग्णांमध्ये घट कायम, पाहा आजची आकडेवारी

गर्दी आणि आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना