Drugs Case : नवाब मलिक यांचे नवे ट्विट, वानखेडे यांच्याबाबत आणखी फोटो केले शेअर

 Mumbai Drugs Case : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नव्याने ट्विट केले आहे.  

Updated: Oct 27, 2021, 09:04 AM IST
Drugs Case : नवाब मलिक यांचे नवे ट्विट, वानखेडे यांच्याबाबत आणखी फोटो केले शेअर title=
संग्रहित छाया

मुंबई : Mumbai Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान (Aryan Khan Case) याच्या विरोधात केलेल्या कारवाईनंतर वादात सापडलेले NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नव्याने ट्विट केले आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा आरोप केला आहे. बनावट जात प्रमाणपत्र आणि पैसे वसुलीचा आरोपानंतर आता मलिक यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे ट्विट केले आहे.

मलिक यांनी सोमवारी आणखी काही आरोप केले. वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रतच मलिक यांनी सादर केली. समीर यांचे आई-वडिल मुस्लीम होते मग त्यांनी राखीव कोट्यातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळविला, असा सवालही मलिक यांनी केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी तसा दावा करताना नव्याने ट्विट केले आहे.   

मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला होता. तसेच त्यांची पत्नी क्रांती रेडकर-वानखेडे हिनेही आरोप करण्यापेक्षा न्यायालयात जा. उगाच बदनामी करु नका, असा सल्ला नवाब मलिक यांना दिला. 15 वर्षांच्या सेवेत त्यांच्यावर कोणताही आरोप झालेला नाही. समीर हे चांगले काम करीत आहेत. आम्हाला बदनाम करणाचा हा प्रयत्न आहे, असा थेट आरोप क्रांती हिने केला. दरम्यान, नवाब मलिक यांनी आणखी एक छायाचित्र ट्विट करुन वानखेडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे काय प्रतिउत्तर देणार याची उत्सुकता आहे.

ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल यांने गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. हे सगळे पैशासाठी चालल्याचा त्याने दावा केला आहे. यातील काही रक्कम अर्थात 8 कोटी समीर वानखेडे यांना देण्याचे ठरले होते, यासाठी किरण गोसावी याचा हात आहे, असे प्रभाकर साईल यांनी आरोप करताना म्हटले आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर त्यांनी आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी बुधवारी मुंबईला रवाना होणार असल्याचे समजते. या चौकशीमुळे वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्यन खान याच्या विरोधात केलेल्या कारवाईबद्दल आरोप करणारे एनसीबीचे पंच प्रभाकर साईल याचा एनसीबी जबाब नोंदवणार आहे. हा जबाब गुरुवारी नोंदण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी या पथकाकडून समीर वानखेडे यांचा बुधवारी जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.