कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये राहणाऱ्या ७ वर्षाच्या मुलीला केईएम रूग्णालयातील डॉक्टरांनी जीवनदान दिलं आहे. जगभरात अतिशय अवघड समजली जाणारी अशक्यप्राय अशी मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया इतर शहरातील डॉक्टरांनी करण्यास असमर्थता दर्शवली असताना केईएमच्या न्युरो सर्जरी विभागानं हे आव्हान पेललं. आणि ते यशस्वीही करून दाखवलं.
निव्या सनोडिया ही मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये राहणारी असून तिचं वय अवघं ७ वर्षे आहे. २ वर्षांपूर्वी खेळत असताना मानेला इजा झाली, माने खालच्या दोन मणक्यातली नस दाबली गेली. यामुळे मणक्यातला गॅप वाढत गेला आणि शरीराची हालचालही मंदावली. गेल्या ८ महिन्यांपासून तर तिचं चालणंही बंद झालं होतं. वडिलांनी इंदोर, छिंदवाडासह नागपूर शहरातील अनेक रूग्णालयात तिला दाखवले, मात्र कुठल्याच डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचं धाडस दाखवलं नाही.
अखेर नागपूरातील डॉक्टरांनी केईएमच्या न्युरो सर्जरी विभागाच्या डॉ अतुल गोयल यांच्याकडे जाण्यास सांगितलं. गोयल यांनी हे आव्हान पेलत निव्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून दाखवली.
आता निव्या हातापायांची हालचाल करू लागली आहे. हळुहळु तिला चालताही येऊ लागेल. मुलीवर झालेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे वडिलांची काळजी दूर झाली आहे.
केईएमच्या न्युरो सर्जरी विभागात अशा अनेक दुर्मिळ शस्त्रक्रिया डॉ अतुल गोयल यांनी केल्या आहेत. गेल्या वर्षभरात मणक्यावरच्या जवळपास २२० यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. गोयलांनी सात वर्षाच्या निव्याला दिलेलं जीवदान खरंच कौतुकास्पद आहे.