डोंबिवली रेल्वे स्टेशन बनतंय मृत्यूचा सापळा

शनिवारी डोंबिवलीत झालेल्या रेल्वे अपघातामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला.

Updated: Jan 19, 2020, 07:33 PM IST
डोंबिवली रेल्वे स्टेशन बनतंय मृत्यूचा सापळा title=

आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : शनिवारी डोंबिवलीत झालेल्या रेल्वे अपघातामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला. गेल्या वर्षभरात लोकलच्या अपघातात सात डोंबिवलीकरांना आपला प्राण गमवावा लागला. मात्र या रेल्वे अपघात नेमकं जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

रेल्वेच्या दरवाजातच अनेक जण जागा अडवून उभे राहतात. नव्याने चढणाऱ्या प्रवाशांसाठी हे त्रासाचं ठरतं आहे. प्रत्येकाला कामाची वेळ गाठाय़ची असते. कितीही लोकल सोडल्या तरी कामांच्या वेळेत रेल्वे ह्या खचाखच भरलेल्या असतात. अशात आपल्या जीवावर बेतणारा प्रवास केला जातो. शनिवारी रेल्वे अपघातात आणखी एक तरुण जखमी झाला. 

विशाल गुरवने खाजगी कंपनीत कामाला जात असताना डोंबिवली स्टेशनहून सीएसीएमटी लोकल पकडली. एकीकडे सकाळची गर्दी आणि दुसरीकडे लोकलचे दरवाजे अडवून काही प्रवाशी उभे होते. त्यामुळे प्रचंड गर्दीमुळे कोपर स्थानक येण्यापूर्वी गुरव हा लोकलमधून खाली पडला आणि या अपघातात त्याच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपाचार सुरु आहेत.

रेल्वेतल्या वाढत्या अपघातांमुळे दरवाजात गर्दी करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईची मागणी केली जाते आहे. तसंच मेट्रोसारखेच लोकले दरवाजे ऑटोमेटीक बंद होतील याचाही विचार रेल्वेने करावा अशी मागणी होते आहे.

गेल्या वर्षभरात लोकलच्या गर्दीमुळे फक्त डोंबिवलीत आतापर्यंत सात जणांना जीव गमवावा लागला आहे. नववर्ष सुरू झाल्यानंतरही हे ग्रहण सुटलेलं दिसत नाही. त्यामुळे याबाबत तातडीने तोडगा काढावा अन्यथा नाहक बळींच्या आकडेवारीत वाढ ही होतच राहील.