नवी दिल्ली : महाजॉब्स योजनेच्या जाहिरातवर काँग्रेस नेत्यांचा फोटो न छापल्यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी ट्विट करुन याबाबतची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. 'आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. असं काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन म्हटलं.
या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. फोटो कोणाचाही छापा, पण ज्या घोषणा केल्या आहेत त्या पूर्ण करा. लोकांना फायदा होईल, असं काम करा. भांडण करा, वाद करा, कोणाचाही फोटो लावा, पण आधी नोकऱ्या दिल्या का ते सांगा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेले आहेत. तिकडे त्यांनी हे वक्तव्य केलं. दिल्लीमध्ये फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठीची वेळ मागितली असल्याचं फडणवीस म्हणाले.
महाजॉब्स योजनेच्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा फोटो आहे. पण काँग्रेसच्या एकाही नेत्याला या फोटोमध्ये स्थान नाही.
'राज्य सरकारच्या धोरणाची जाहिरात असल्यामुळे तीनही पक्ष त्यात दिसावेत ही साहजीकच अपेक्षा आहे. उद्योगमंत्र्यांचा मला फोन आला होता त्यांच्या लक्षात ती चूक आली आहे. एका जाहिरातीवरुन सगळं काही ठरवता येत नाही. तीनही पक्षांचा संवाद चांगला आहे, पण याबाबतीत काळजी घेतली पाहिजे,' अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.