निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई वाटपाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री

उर्वरित मदत वाटपाचे कामही तातडीने आणि व्यवस्थित पूर्ण करा

Updated: Jul 17, 2020, 05:26 PM IST
निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई वाटपाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूंबांना नुकसानभरपाई देण्याचे काम व्यवस्थित सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच मदतीचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत निसर्ग चक्रीवादळातील पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचा आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गात निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली आहे. अद्यापही मदत देण्याचे काम सुरूच आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित मदतही  तत्काळ देण्यात यावी  यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. कुठलाही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 कोकणात सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रस्ते, वीजपुरवठा, मोबाईल कनेक्टीव्हीटी पूर्ववत करण्यात अडचण येत असली तरी या मधील प्रलंबित कामे ही लवकरात लवकर पूर्ण करण्यास प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

या बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार , मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
 
आतापर्यंत वितरीत करण्यात आलेला निधी खालीलप्रमाणे

* रायगड जिल्ह्यासाठी रु.३७२.९७ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
* रत्नागिरी जिल्ह्यासाठी रु.११६.७८ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
* सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रु. ३७.१९ लाख  इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.