कोरोना संकट : केशरी, हिरव्या झोनमधील उद्योग सुरु करणार - सुभाष देसाई

कोरोना संकटामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. 

Updated: Apr 15, 2020, 07:36 AM IST
कोरोना संकट : केशरी, हिरव्या झोनमधील उद्योग सुरु करणार - सुभाष देसाई title=

मुंबई : कोरोना संकटामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. एक दोन दिवसांत तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल. त्यानंतर रेड झोन वगळून इतर ठिकाणचे उद्योग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या १५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल डिक्कीच्या सर्व जिल्यातील सदस्य आणि पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला. त्यावेळी ही माहिती दिली. उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योगांना मोठ्या आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेतली जाईल. मुंबईत सर्व बँकांचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची एक बैठक घेतली जाईल, असेही  देसाई यांनी सांगितले.

यावेळी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की वेस्ट इंडियाचे बँकिंग प्रमुख विजय सोमकुवर, डिक्की महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष कांबळे, डिक्की मुंबईचे अध्यक्ष अरुण धनेश्वर, डिक्की विदर्भचे अध्यक्ष गोपाल वासनिक, मराठवाडा चे अध्यक्ष मनोज आदमने, मुंबईचे उपाध्यक्ष पंकज साळवे यांचेसह १०० डिक्की उद्योजक आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांना कोरोनाच्या संकटामुळे येणाऱ्या अडचणीबाबत डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, निश्चय शेळके, संतोष कांबळे व पंकज साळवे आदींनी माहिती दिली. यात प्रामुख्याने उद्योगाना या संकटामुळे खेळते भांडवलाची कमतरता, आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआय भरण्यास अवधी दिला असला तरी त्यावर चक्रवाढ व्याज आकारण्यात येणार आहे, त्यामुळे व्यावसायिक पुन्हा अडचणीत येणार आहे, असे ते म्हणालेत.

दरम्यान, राज्य शासन उद्योगांना चालना देण्यासाठी काही झोन तयार केले आहेत. हिरवा पट्टा यात पंधरा जिल्हे येतात. त्या ठिकाणी कोरोनाची लागन झालेली नाही. केशरी झोनमध्ये १४ जिल्हे येतात. त्या १ ते १५ लोकांना लागन झालेली आहे. २९ जिल्ह्यात उद्योगाला चालना देता येईल. या ठिकाणी उद्योग सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे सुभाष देसाई यांनी सांगितले. 

उर्वरित लाल पट्ट्याच १२३ महानगर पालिका क्षेत्रात कोरोनाची मोठी लागण आहे. या ठिकाणी लॉकडाऊन कडकपणे राबवावे लागणार आहे. उद्योग सुरु करण्यासाठी एक दोन दिवसांत कृती आराखडा अहवाल तयार होईल, तो मुख्यमंत्र्यांना सादर केली जाईल.  कृषी मालावर प्रक्रिया करण्याचे काम निरंतर चालू राहिले पाहीजे. शेतकऱ्यांचा गावगाडा नियमित सुरू राहीले. कीटकनाशके, अवजारे, उद्योग सुरू राहिल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेती उत्पादने सुरू राहतील हे पाहवे लागेल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.