मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या दादर पूर्व येथील चित्रा सिनेमा हे चित्रपटगृह गुरुवारी कायमस्वरुपी बंद होणार आहे. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणारा 'स्टुडण्ट ऑफ द इयर २' या चित्रपटाच्या शेवटच्या शोनंतर चित्राच्या तिकीच खिडक्या कायमस्वरुपी बंद होणार आहेत. जवळपास सात दशकांहून अधिक काळ चित्रपट रसिकांच्या मनोरंजनास सज्ज असणारं हे चित्रपटगृहं बंद होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे.
चित्रपगृहाचा डबघाईला गेलेला व्यवसाय आणि धालेल्या नुसकानाचं कारण देत चित्रा सिनेमाचे मालक दारा मेहता यांनी चित्रपटगृह बंद होत असल्याची माहिती दिली. त्यांनी आपले वडील, पी.डी. मेहता यांच्याकडून १९८२ मध्ये चित्रपटगृहाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली असल्याचं वृत्त मिड डेने प्रसिद्ध केलं आहे.
'सिंगल स्क्रीन थिएटरच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांची पावलं इथे वळतात. पण, संपूर्ण आठवड्यादरम्यान अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच प्रेक्षक इथे येतात', असं ते म्हणाले. चित्रपटगृह पुनर्निर्माणासाठी द्यायचं की मल्टीप्लेक्सच्या साखळीत ते समाविष्ट करायचं याविषयी कोणतीच गोष्ट सध्या स्पष्ट नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांची संख्या कमी होत जात असल्याची ही परिस्थिती अतिशय विदारक असल्याचं म्हणत त्यांनी दु:ख व्यक्त केलं. १९६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या शम्मी कपूर यांच्या 'जंगली' या चित्रपटाच्या वेळी या चित्रपटगृहात तोबा गर्दी झाली होती. त्याचीच वाहनं पार्क करण्यासाठीची जागा आज ओस पडलेली दिसते. जवळपास २५ आठवड्यांसाठी 'जंगली' या चित्रपटाची धूम चित्रा सिनेमाने पाहिली आहे, ही आठवणही मेहता यांनी सांगितली.
चित्रपटगृह व्यवसायातील प्रगत तंत्रज्ञानाला नेहमीच चित्रा सिनेमाकडून प्राधान्य दिलं जात असे. चित्रा सिनेमा हे, मुंबईतीच पहिलं वातानुकूलित चित्रपटगृह असल्याचंही म्हटलं जातं. वेळोवेळी त्याच्या नुतनीकरणाचीही कामं करण्यात आली. पण, ऑनलाईन चित्रपटांच्या प्रदर्शनाचं वाढतं प्रमाणा आणि त्याचा प्रेक्षकांवर असणारा प्रभाव या साऱ्याच फटका चित्रपटगृह व्यवसायाला बसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.