मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतल्या गुन्ह्यांचं प्रमाण घटल्याचं माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार देशभरातील गुन्ह्यांच्या यादीत मुंबई चौथ्या स्थानावर आहे. याआधी गुन्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक तिसरा होता. नुकतीच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने १९ शहरांची यादी जाहीर केली त्यात सर्वाधिक गुन्ह्यांची पहिली पाच शहरं सांगण्यात आली आहेत.
दिल्लीत सर्वाधिक २ लाख ३७ हजार ६६० गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चेन्नईत ८५ हजार २७ गुन्हे दाखल आहेत. सुरत तिसऱ्या स्थानावर असून ६० हजार ३८४ गुन्ह्यांची नोंद आहे. तर मुंबईत ५७ हजार ७३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. शेवटी पाचव्या क्रमांकावर कोचीमध्ये ५४ हजार ६६७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून अथक परिश्रमातूनच गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत मुंबई पोलिसांनी व्यक्त केलंय.
महिला आणि मुलांवरील अत्याचार, अपहरणाचे गुन्हे, अल्पवयीन गुन्हेगारी ज्येष्ठांवरचे अत्याचार, हत्या यामध्ये मात्र मुंबई ही दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत करून स्वप्ननगरी मुंबईला कोणत्याही गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याची गरज व्यक्त होतेय.