Kalyan Crime News : कल्याणमध्ये (Kalyan News) बुधवारी रात्री झालेल्या पोलीस उपनिरिक्षकाच्या (PSI) हत्येने (Kalyan Crime News) एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्वच्या सिध्दार्थनगर येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वसाहतीमध्ये हा सर्व प्रकार घडला. एका हवालदाराने लाकडी दांडक्याने रेल्वे सुरक्षा बलातील एका पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या केली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी हवालदाराविरोधात हत्येचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही तासातंच पोलिसांनी आरोपी हवालदाराला अटक केली आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या बसवराज गर्ग (56) यांची पंकज यादव (35) या हवालदाराने बुधवारी रात्री दांडक्याने मारहाण करत हत्या केली. पंकज यादव हा रेल्वे सुरक्षा बलाच्या रोहा विभागात कार्यरत आहे. कोळसेवाडी पोलिसांनी गर्ग यांच्या हत्येनंतर काही तासांतच पंकज यादव याला अटक केली आहे. दुसरीकडे या हत्येचे कारण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
नेमकं काय झालं?
बुधवारी रात्री दहा वाजता पोलीस उपनिरीक्षक बसवराज गर्ग हे आपल्या खोलीत गाणी ऐकत झोपले होते. यावेळी खोलीच्या बाहेर गर्ग यांचे सहकारी उपनिरीक्षक राकेशकुमार त्रिपाठी धुतलेले कपडे दोरीवर वाळत घालत होते. त्यावेळी त्रिपाठी यांना कोणीतरी खोलीत गेल्याचे जाणवले. यानंतर अचानक आतून ओरडण्याचा आवाज आल्याने त्रिपाठी यांनी खोलीच्या आतमध्ये धाव घेतली. त्यावेळी गर्ग हे खाली पडल्याचे त्रिपाठी यांनी पाहिले. त्रिपाठी यांनी खोलीत शिरलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता तू मध्ये पडू नको अशी धमकी दिली. यानंतर त्रिपाठी यांनी आरडाओरडा करुन आपल्या सहकाऱ्यांना बोलवले आणि घडलेला प्रकार सांगितला.
इतर सहकारी आल्याचे पाहताच मारेकऱ्याने तिथून पळ काढला. मात्र सहकाऱ्यांनी त्याला पाहिले आणि तो रेल्वे सुरक्षा बळातील हवालदार पंकज यादव असल्याचे समोर आले. त्रिपाठी यांनी बसवराज यांना उपचारांसाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपनिरीक्षक त्रिपाठी यांच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी पंकज यादव याला अटक केली.
कशासाठी झाली हत्या?
बसवराज गर्ग आणि आरोपी हवालदार पंकज यादव हे दोघेही 2019 साली कल्याण रेल्वे सुरक्षा दलात एकत्र कार्यरत होते. त्यावेळी बसवराज गर्ग यांनी पंकज यादव याच्या वेतनवाढीच्या तीन वर्षाबाबत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे अहवाल दिला होता. त्यामुळे पंकज यादव याची वेतनवाढ रोखण्यात आली होती. तेव्हापासूनच यादवने बसवराज गर्ग यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या आणखी तिघांच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती समोर आली आहे.