Crime News: मुंबईत तीन दिवसात 40 बँक ग्राहकांनी गमावले लाखो रुपये; तुम्ही ही चूक करत नाही ना?

Crime News: मुंबईत एका खासगी बँकेच्या 40 ग्राहकांची बनावट मेसेजच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ग्राहकांच्या मोबाइलवर केवायसी (KYC) आणि पॅन कार्डची (Pan Card) माहिती अपडेट करण्याचा एक बनावट मेसेज आला होता. पोलिसांनी यानंतर ग्राहकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.   

Updated: Mar 5, 2023, 05:36 PM IST
Crime News: मुंबईत तीन दिवसात 40 बँक ग्राहकांनी गमावले लाखो रुपये; तुम्ही ही चूक करत नाही ना? title=

Crime News: तुमच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजची कोणतीही शहानिशा न करता तुम्ही क्लिक करता का? जर तुम्ही असं करत असाल तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. मुंबईत नुकतंच एका खासगी बँकेतील (Private Bank) तब्बल 40 ग्राहकांना लाखोंचा गंडा बसला आहे. या 40 ग्राहकांनी एका चुकीमुळे तीन दिवसात लाखो रुपये गमावले आहेत. मोबाइलवर आलेल्या एका मेसेजवर क्लिक केल्याने त्यांना आपल्या कष्टाची कमाई गमवावी लागली आहे. पोलिसांनी (Mumbai Police) या घटनेची नोंद घेत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. 

नेमकं काय झालं? 

एका खासगी बँकेच्या 40 ग्राहकांच्या मोबाइलवर केवायसी (KYC) आणि पॅन कार्डची (Pan Card) माहिती अपडेट करण्याचा एक बनावट मेसेज आला होता. या सर्व ग्राहकांनी कोणतीही शहानिशा न करता या मेसेजवर क्लिक केल्यानंतर चोरांनी त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले आहेत. 40 ग्राहकांची ही रक्कम लाखोंमध्ये आहेत. बँक ग्राहकांना आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी KYC प्रक्रिया (Know Your Customer) अनिवार्य असते. 

नेमकी फसवणूक कशाप्रकारे होते?

या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपली खासगी माहिती विचारणाऱ्या लिंकवर क्लिक करताना काळजी घ्या असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. फसवणूक करणारे असे बनावट मेसेज ग्राहकांना फिशिंग लिंकसह पाठवत आहेत. या मेसेजमधअये तुम्ही केवायसी/पॅन कार्डची माहिती अपडेट न केल्यामुळे बँक खाते ब्लॉक केलं आहे असं लिहिलेलं असतं. 

या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बँकेच्या बनावट वेबसाईटवर जाता. तिथे तुम्हाला कस्टमर क्रमांक, पासवर्ड आणि इतर खासगी माहिती विचारली जाते. ही माहिती भरल्यानंतर तुम्ही स्वत:ला फसवणुकीच्या या जाळ्यात अडकवलेलं असतं. दरम्यान, ज्या 40 जणांची फसवणूक करण्यात आली आहे, त्यामध्ये टीव्ही अभिनेत्री श्वेता मेमनचाही समावेश आहे. 

श्वेता मेमनने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, बँकेकडून आलेला मेसेज समजत आपण लिंकवर क्लिक कोलं होतं. यानंतर जे पोर्टल सुरु झालं होतं तिथे आपण आपला कस्टमर आयडी, पासवर्ड आणि ओटीपी टाकला होता. आपल्याला बँक कर्मचारी असल्याचं सांगत एका महिलेचा फोनही आला होता. तिने आपल्याला मोबाइलवर आलेला नवा ओटीपी देण्यास सांगितला. आपण ओटीपी दिला असता काही वेळातच खात्यातून 57 हजार 636 रुपये काढून घेण्यात आले.