HSC Exam Paper Leak : शुक्रवारी बुलढाणा (buldhana) जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात बारावीच्या (HSC Exam) गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. झी 24 तासने ही बातमी सर्वात प्रथम समोर आणलं होतं. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसांत (buldhana police) अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता साखरखेर्डा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर कलम 420, 120 ब तसेच विद्यापीठ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन शिक्षकांचा समावेश आहे. गोपाल शिंगणे आणि गजानन आढे असे या शिक्षकांचं नाव असून इतर तिघे आजूबाजूच्या गावातील तरुण आहेत त्यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. शनिवारी दादर पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी शनिवारी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याला गणिताच्या पेपरवेळी कॉपी करताना पकडल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आणखी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून यामध्ये एका शिक्षकाचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे.
शुक्रवारी दुपारी 2.10 वाजता दादर येथील डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये पेपर संपल्यानंतर ही बाब उघडकीस आली. परीक्षा केंद्राच्या प्रमुखांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एका विद्यार्थ्याने परीक्षेच्या हॉलमध्ये मोबाईल आणला होता. त्यानंतर एका वर्गाच्या पर्यवेक्षकांनी परीक्षा केंद्राच्या प्रमुखांना सांगितली. विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान त्यांचे मोबाईल फोन स्वतः जवळ ठेवण्याची परवानगी नसते. मात्र तरीही या विद्यार्थ्याने मोबाई फोन स्वतः जवळ ठेवला होता.
पर्यवेक्षकांनी या विद्यार्थ्याचा मोबाईल तपासला असता त्याला प्रश्नपत्रिकेचा काही भाग सकाळी 10.17 वाजता मिळाल्याचे समोर आले. याबाबत विद्यार्थ्याला विचारले असता मला मित्राने हा पेपर पाठवला होता असे सांगितले. त्या मित्रालाही दुसऱ्या मित्राने पेपर पाठवला होता, असेही समोर आले आहे. परीक्षेच्या सभागृहात प्रवेश करण्याच्या काही मिनिटांपूर्वी दादरच्या सेंटरवरील विद्यार्थ्याने सकाळी 10.21 वाजता एका व्यक्तीला ही प्रश्नपत्रिका फॉरवर्ड केली होती. त्यानंतर त्याची उत्तरे अज्ञात व्यक्तीने दादर सेंटरवरील विद्यार्थ्याला पाठवली होती.
त्यानंतर आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे आणि डीसीपी प्रशांत कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या नेतृत्वात एक पथक या प्रकरणाची चौकशी करत आहे. गुन्हे शाखेला व्हॉट्सअॅप क्रमांक असलेल्या व्यक्तींचा तपशील देखील मिळाले आहेत. या क्रमांकावरुन एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली होती.