मुंबई : कोरोना व्हायरस ही देशावर आलेली आपत्ती आहे. आज महाराष्ट्र आणि संपूर्ण देश त्याचा एकजुटीने मुकाबला करत आहे. राज्य सरकार यासाठी जी काही पाऊले उचलतेय, त्याला आमचे संपूर्ण समर्थन आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान, हे आवाहन करतानाच आताची परिस्थिती हाताळण्यासाठी काही सूचना सुद्धा त्यांनी राज्य सरकारला केल्या आहेत. आज मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा महानगरांमधील व्यवहार ठप्प होत असताना रोजंदारी कामगारांबाबत काही उपाययोजना राज्य सरकारला कराव्या लागतील. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात सुमारे ५० लाख बांधकाम कामगार आहेत. बांधकाम कामगारांसाठीचा एक सेस राज्य सरकारकडे आहे. त्यात सुमारे ४००० कोटी रूपये निधी आहे. या निधीचा वापर करून या रोजंदारी कामगारांच्या जेवणाची, त्यांच्या भत्त्याची व्यवस्था राज्य सरकारला करता येईल, असे त्यांनी सुचवले आहे.
#BreakingNews । कोरोनाचे संकट आले आहे. महाराष्ट्र आणि संपूर्ण देश त्याचा एकजुटीने मुकाबला करत आहे. राज्य सरकार यासाठी जी काही पाऊले उचलतेय, त्याला आमचे संपूर्ण समर्थन आहे. नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.@ashish_jadhao pic.twitter.com/sKoYcvyHqP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 21, 2020
इतरही विविध प्रकारचे कामगार दैनंदिन उत्पन्नावर उदरनिर्वाह करीत असतात. अशांसाठी स्वयंसेवी संघटनांकडून मदत घेऊन, त्यासंदर्भात एसओपी तयार करून तपशीलवार मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची सुद्धा नितांत गरज आहे. रोजगारावर जे संकट आले त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने पाऊले उचलण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने विविध प्रकारच्या फाईलिंगच्या तारखा जूनपर्यंत लांबणीवर टाकल्या आहेत. त्याच धर्तीवर राज्यातील महापालिकांना सुद्धा ३१ मार्चपर्यंत जे कर भरावे लागतात, त्याला मुदतवाढ देण्याचे निर्देश देण्याची गरज आहे. काही ठिकाणी सक्तीने वसुली किंवा जप्तीच्या कारवाई होत आहेत. त्या या काळात करू नयेत, अशा सूचना निर्गमित करण्याची गरज आहे, असे फडवणीस यांनी सल्ला दिला आहे.
सध्या विविध महानगरांमध्ये रेल्वे स्थानकावर गावी परत जाणार्यांची मोठी गर्दी उसळली आहे. महानगरातील संकट हे हळूहळू गावांकडे जाणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. रेल्वे स्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था तिप्पट करणे, तेथे पोलिस बंदोबस्त वाढविणे, ही गर्दी ज्या भागात जात आहेत, तेथे सुद्धा आरोग्य तपासणीच्या पुरेशा व्यवस्था निर्माण करणे, आवश्यकता भासल्यास तेथे आयसोलेशनच्या व्यवस्था उभाराव्या लागणार आहेत. यातूनच गर्दीतून होणारा संसर्ग थांबविता येईल. महाराष्ट्रातील स्थिती सध्या गंभीर आहे, असेही ते म्हणाले.
दिवसांगणिक रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता नागरिकांनी स्वत:वर निर्बंध घालणे आवश्यक आहे. यामुळेच जनता कर्फ्यू महत्त्वाचा आहे. त्यातून आपण ही सायकल मोडू शकणार आहोत. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आम्ही सर्व सूचना केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवितो आहे. राज्य सरकारच्या सर्व योजनांना संपूर्ण समर्थन आहे. या सूचनांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना राज्यभरातील कार्यकर्त्यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.