ठाणे, मीरा भाईंदरमधल्या हॉटस्पॉटमध्ये पुन्हा लॉकडाऊन

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला.

Updated: Jul 19, 2020, 01:58 PM IST
ठाणे, मीरा भाईंदरमधल्या हॉटस्पॉटमध्ये पुन्हा लॉकडाऊन title=

ठाणे : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातल्या अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. १९ जुलैनंतर लॉकडाऊन कायम राहणार का शिथील होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला होता. ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला आहे. या दोन्ही महापालिका क्षेत्रांमध्ये असलेल्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात येणार आहे. या दोन्ही महापालिकांच्या हॉटस्पॉटमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असेल. कोरोना व्हायरसचे रुग्ण आटोक्यात येत नसल्यामुळे दोन्ही महापालिकांमधल्या आयुक्तांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातल्या महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. लॉकडाऊनला विरोध होत असला तरी दडपणाला बळी पडू नका, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत घेतली. गरज असेल तिकडे लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिले.

शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्याना सांगितले.