सायन-पनवेल मार्गावर ट्रकमधले अवैध प्रवासी ताब्यात

. सायन-पनवेल महामार्गावर २ ट्रकमध्ये ४० जण आढळले 

Updated: Mar 28, 2020, 02:46 PM IST
सायन-पनवेल मार्गावर ट्रकमधले अवैध प्रवासी ताब्यात  title=

नवी मुंबई : कोरोना वायरसचा प्रसार होऊ नये म्हणून देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही नागरिक लॉकडाऊन तोडून अवैध प्रवासाचा अवलंब करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी काहीजण ट्रक, रुग्णवाहिका, दुधाचे टॅंकर अशा वाहनांचा वापर करत आहेत.सायन पनवेल महामार्गावर असाच एक प्रकार समोर आला आहे. २ ट्रकमधून अवैध प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.  

गेल्या तीन दिवसांपासून विविध मार्गाने अवैध प्रवासाच्या घटना समोर येत आहेत. सायन-पनवेल महामार्गावर २ ट्रकमध्ये ४० जण आढळले आहेत. हे प्रवासी ट्रकमध्ये पूर्णपणे लपून चालले होते. ट्रकमधील कापड स्वत:च्या अंगावर ओढून घेऊन त्यांनी स्वत:ला झाकून घेतले होते. पण पोलिसांनी केलेल्या ट्रकच्या तपासणीत हे प्रवासी उघडे पडले. 

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी हे नियम कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील याचे गांभीर्य लक्षात घेऊन घराबाहेर न पडण्याची गरज आहे. अशाप्रकारे नियम डावलून प्रवास सुरु राहीला तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. 

मुंबईत आतापर्यंत ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून अनेक रुग्ण बरे होत असल्याचंही चित्र आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊन असलं तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय. तरीही नागरिक बाजारात मोठी गर्दी करताना दिसतात. सरकारकडून घरीच राहण्याचं सतत आवाहन करण्यात येतंय. 

मात्र नागरिक याकडे तितकंस गंभीरपणे पाहत नसल्याचं चित्र आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस घरीच राहावं. आगामी १५ ते २० दिवस आपल्यासाठी अत्यंत कसोटीचे असून या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे आता नागरिकांनी कृपा करून घराबाहेर पडूच नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५९ वर गेलाय. तर संपूर्ण देशात ८०० हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत.