दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कोविड टेस्टचे दर बाराशे रुपयांपर्यंत आणण्यात येणार असून त्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टोपेंनी बुधवारी जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागात पसरत चाललेला कोरोना चिंतेचा विषय आहे. श्रीमंत लोक आयसीयू बेड्स अडवून ठेवत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
पुण्यातील रिपोर्टर मृत्यू प्रकरणी बोलताना, अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो ही बाब दुर्देवी असल्याचं ते म्हणाले. तसंच याबाबत चौकशी करु असा विश्वासही त्यांनी दिला आहे.
रुग्णांसाठी गरजेपेक्षा जास्त अॅम्ब्युलन्स सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात कोरोना पसरतोय ही चिंतेची बाब आहे. बरेचसे लोक लक्षणं नसताना आयसीयूमध्ये अॅडमिट होतात. श्रीमंत लोक असं करतात त्यामुळे आयसीयू बेडची कमतरता भासत असल्याचं, टोपे म्हणाले.
कोरोना टेस्ट कमी केल्या असा कोणताही विषय नाही. एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला, की त्याच्या संपर्कातील 20 लोकांचं ट्रेसिंग केलं जातं आहे. ICMRच्या गाईडलाईन्सच्या बाहेर राज्य सरकार काम करत नाही, काहीही लपवलं जात नसल्याचंही टोपेंनी सांगितलं.
कोविडवर सरकार पारदर्शक काम करत आहे. जे दर नियंत्रण केले आहेत, ते विमा कंपन्यांच्या दराच्या आधारावर केले आहेत. कोविड टेस्टचे दर आता 1900 रुपये आहे, ते 1200 रुपयांपर्यंत आणणार असून याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल आणि दर खाली आणले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.