चिंता वाढवणारी बातमी! राज्यासह मुंबईत गेल्या 3 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट

कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत, गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

Updated: Jun 1, 2022, 07:11 PM IST
चिंता वाढवणारी बातमी! राज्यासह मुंबईत गेल्या 3 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट title=

Corona Update : कोरोनाबद्दल  (Corona) सावध करणारी बातमी. राज्यात कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) येतेय की काय अशी भीती आहे. कारण आज राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली आहे.  गेले अनेक दिवस हजाराच्या आत असलेली रुग्णसंख्येने आज हजाराचा टप्पा पार केला आहे.

गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोनाच्या 1081 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आढळली आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासात 739 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत शंभरच्या आसपास रुग्णसंख्या होती तिची आता हजाराकडे वाटचाल सुरू झालीय. त्यामुळे पुन्हा मास्कची सक्ती होण्याचीही शक्यता आहे. 

गेल्या चोवीस तासात 524 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 77,36,275 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 98.07% इतकं झालं आहे.

चांगली बाब म्हणजे राज्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यात सध्या 4032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई महापालिका अलर्टमोडवर
वाढत्या रुग्णसंख्येचा धोका लक्षात घेता मुंबईतील कोरोना टेस्टची संख्या वाढवण्यात येणार आहे. कोरोना रोखण्यासाठी 12 ते 18 या वयोगटातील लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुस्टर डोसची संख्या वाढवावी, असेही निर्देश पालिकेने दिले आहेत.

जम्बो कोविड सेंटर पुन्हा सज्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मालाडमध्ये असलेलं जम्बो कोव्हिड सेटंर प्राधान्यांना सज्ज होणार आहे.  जेणेकरुन भविष्यात जर कोरोना वाढला, तर रुग्णांची गैरसोय होणार नाही.

वॉर रुम पुन्हा एकदा सक्रीय
पालिकेच्या निर्देशानुसार, वॉर रुम पुन्हा एकदा सक्रीय होणार आहेत. वॉर रुमच्या माध्यमातून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच मदतीसाठी मुंबईतील प्रत्येक प्रभाग कार्यालयात वॉर रुम तयार करण्यात आले होते. वॉर रुममधून आपल्या हद्दीतील कोणत्या रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत याची माहिती ठेवली जाते.