नवी दिल्ली : राजकारणाचा मंच असो किंवा नसो केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे त्यांचे विधान आणि कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. जगावर कोरोनाचे संकट असताना त्यांनी दिलेल्या 'गो कोरोना' नाऱ्याची देशभरातील सोशल मीडियात चर्चा झाली. सध्या देशात संचारबंदी जाहीर केल्यानंतर रामदास आठवले यांनी देखील घरी राहण्याला पसंती दिली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आला आहे. यामध्ये ते घरच्या किचनमध्ये आम्लेट बनवायला शिकत आहेत.
गो कोरोना कोरोना गो चा नारा देणारे रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जनतेने कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी घरीच राहा असे आवाहन केले. लॉकडाऊनच्या काळात घरी राहण्यासाठी विविध खेळ, छंद, व्यायाम, पुस्तक वाचन करण्यात वेळ घालवावा असे त्यांनी सांगितले.
आज त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन आवडती रेसिपी म्हणजे आम्लेट तयार केले. केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वयंपाक घरात जाऊन त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांच्याकडील स्वयंपाक घराचा ताबा घेत गॅस पेटवून आम्लेट तयार केले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विदेशी नागरिकासोबतचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत चायना-इंडिया साँग असं म्हणत रामदास आठवलेंनी एक प्रार्थना केली . 'कोरोना गो.... गो कोरोना गो....'असे या गाण्याचे बोलत आहेत.रामदास आठवलेंसोबत विदेशी नागरिक देखील ही प्रार्थना करत आहे.
कोरोनाचा आवर घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असताना आठवलेंची ही क्लीप हास्याचा विषय ठरत आहे. असं गो कोरोना म्हणून कोरोना जात नसतो अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहे. यावर आठवलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गो कोरोना म्हणण्याचा माझा उद्देश वेगळा होता असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना देशातून नष्ट व्हावा हाच उद्देश होता. करोनाचे बारा वाजवण्यास आम्ही समर्थ आहोत असेही ते म्हणाले.
कोरोनाचे देशभरात ५६ बळी, तर २ हजार ३०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात बळींचा आकडा २१ केला आहे. राज्यात ३६ तासांत ८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यत वाढ दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर जगभरात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. आतापर्यंत १० लाख जणांना लागण तर ५० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत सर्वाधिक १३ हजार ९०० जणांचा मृत्यू झाला आहे तर अमेरिकेत एकाच दिवसात हजारावर बळी गेले आहेत.